चारा उपलब्ध करून देण्याकडे दुर्लक्ष : मनपा आयुक्तांनी लक्ष देण्याची मागणी
बेळगाव : श्रीनगर गो-शाळेतील चारा संपल्याने तेथील जनावरांवर उपासमारीची वेळ आली आहे. तरीदेखील या गंभीर प्रश्नाकडे महानगरपालिकेने दुर्लक्ष केले असल्याने तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. गेल्या काही दिवसांपासून ही परिस्थिती ओढावली असून, याकडे तातडीने मनपा अधिकाऱ्यांनी लक्ष देऊन चारा उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी केली जात आहे.शहर व उपनगरातील मोकाट जनावरे पकडण्याचा ठेका महापालिकेकडून नवीन ठेकेदाराला देण्यात आला आहे. त्यामुळे विविध ठिकाणी सातत्याने जनावरे पकडली जात आहेत. पकडलेल्या जनावरांची रवानगी श्रीनगर येथील गोशाळेत केली जात आहे. मोकाट जनावरांची संख्या कमी व्हावी, यासाठी महापालिकेचे प्रयत्न सुरू आहेत. पण त्याला अद्यापही म्हणावे तसे यश आलेले नाही. उलट दिवसेंदिवस जनावरांची संख्या वाढतच चालली आहे. जनावरे शहरात सोडण्यात येऊ नये, अशी सूचना केली जात असली तरी जनावर मालकांकडून त्याकडे दुर्लक्ष केले जात आहे. पकडलेले जनावर सोडण्यासाठी संबंधित मालकांकडून दोन हजार रुपयांचा दंड वसूल केला जात आहे. त्यापैकी एक हजार रुपये ठेकेदाराला व एक हजार रुपये गो-शाळेला दिले जात आहेत.
अपुऱ्या चाऱ्यामुळे जनावरांची तब्येत खालावली
सध्या श्रीनगर येथील गो-शाळेत 43 मोकाट जनावरे आहेत. पण गेल्या काही दिवसापासून तेथील चारा संपला आहे. त्यामुळे जनावरांवर उपासमारीची वेळ आली आहे. दिवसातून केवळ एकदाच तो अपुरा चारा जनावरांना दिला जात असल्याने जनावरांची तब्येत खालावली आहे. पण चारा उपलब्ध करून देण्याकडे महापालिकेने दुर्लक्ष केले असल्याने तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. या गंभीर प्रश्नाकडे मनपा आयुक्तांनी लक्ष देऊन चारा उपलब्ध करून देण्याची सूचना करावी, अशी मागणी केली जात आहे.









