परीक्षा पे चर्चा’ कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची विद्यार्थ्यांना सूचना, सुचविले इतरही उपाय
► वृत्तसंस्था / नवी दिल्ली
परीक्षेत उत्तम यश मिळविण्यासाठी समय व्यवस्थापन अत्यंत आवश्यक आहे. समय व्यवस्थापनामुळे अभ्यास अधिक सुयोग्य पद्धतीने करता येतो. तसेच वेळ वाया जात नाही. उपलब्ध वेळेचा पूर्णत: सदुपयोग यामुळे करता येतो, अशी महत्वपूर्ण सूचना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या आठव्या ‘परीक्षा पे चर्चा’ या कार्यक्रमात देशातील सर्व परीक्षार्थींना दिला आहे. हा कार्यक्रम सोमवारी सकाळी 11 वाजता दूरदर्शन आणि सरकारी युट्यूब वाहिनीवरुन प्रसारित करण्यात आला.
या कार्यक्रमात प्रत्येक राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांमधून प्रत्येकी 36 विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली होती. या विद्यार्थ्यांना तिळाचे लाडू वितरीत करुन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या कार्यक्रमाला प्रारंभ केला. परीक्षेसंबंधी विविध मुद्द्यांवर तसेच परीक्षेसाठी स्वत:ची सज्जता कशी करावी, यासंबंधी त्यांचे विचार त्यांनी या कार्यक्रमात विद्यार्थ्यांसमोर मांडले आणि त्यांना शुभेच्छा दिल्या.
समय व्यवस्थापनाचे महत्व
आपल्या प्रत्येकाकडे एका दिवसात चोवीस तासांचा समान समय उपलब्ध असतो. तथापि, काहीजण या वेळेचा काटेकोरपणे आणि संपूर्णपणे उपयोग करतात. तर अन्य काही विद्यार्थी इतर काही निरर्थक बाबी करत वेळ वाया घालवितात. वेळेचे व्यवस्थापन करण्यासाठी सकाळी आपण आपले दिवसभराचे कार्यक्रम नोंद करुन ठेवल्यास प्रत्येकाला किती वेळ द्यावा लागणार आहे, याचे नियोजन केले पाहिजे. अभ्यासाचे जे विषय आपल्याला अवघड जातात, त्यांच्यासाठी अधिक वेळ दिल्यास ते समजणे सोपे होते. अवघड विषय हे आपण आपल्यासमोरचे आव्हान आहे असे समजले पाहिजे. अशा विषयाना ‘अडथळा’ समजता कामा नये. अभ्यासाचा प्रारंभ आपण आपल्याला आवडणाऱ्या आणि जमणाऱ्या विषयांपासून केल्यास ंनंतर आव्हानात्मक विषय हाती घेण्याचा आत्मविश्वास निर्माण होतो. अशा प्रकारे वेळेचे व्यवस्थापन करता येते, अशी मांडणी त्यांनी केली.
ध्येय कसे पूर्ण करावे
ध्येयपूर्तीसाठी मनाची एकाग्रता आवश्यक आहे. तसेच, चित्ताची शांतताही लागते. एका विद्यार्थिनीला दहावीच्या वार्षिक परीक्षेत 93 प्रतिशत गुण मिळाले. पण तिची अपेक्षा 95 टक्के गुणांची होती. त्यामुळे एवढे उत्तम गुण मिळूनही ती स्वत:वर नाराज झाली होती. तसे होता कामा नये. आपण स्वत:समोर विशिष्ट ध्येय ठेवले असेल, तर ते पूर्ण करता येण्यासारखे असावयास हवे. आपली क्षमता आणि आवश्यकता लक्षात घेऊन ते निर्धारित केल्यास नंतर अपेक्षाभंगाचे दु:ख सहन करावे लागणार नाही, अशीही मोलाची सूचना त्यांनी परीक्षार्थींना केली. एकदम सारा अभ्यास मनात ठेवण्यापेक्षा छोटी छोटी ध्येये दृष्टीसमोर ठेवून ती क्रमाक्रमाने पूर्ण करत गेल्याने अंतिमत: संपूर्ण अभ्यास व्यवस्थित पार करता येतो. त्यामुळे विद्यार्थ्यांवर अभ्यासाचे दडपणही येत नाही, असे प्रतिपादन त्यांनी केले.
सेल्फ मोटिव्हेशन महत्वाचे
कोणतेही ध्येय पूर्ण करताना स्वत:ला शेवटपर्यंत उत्साही ठेवणे आवश्यक आहे. पूर्ण करता येण्यासारखी ध्येये एका पाठोपाठ एक अशा प्रकारे हाती घेतल्याने शेवटपर्यंत उत्साह टिकवून धरता येतो. आपली दृष्टी चौफेर असेल, तर दृष्टीला पडणाऱ्या प्रत्येक बाबीतून आपल्याला प्रेरणा घेता येते, अशीही सूचना त्यांनी केली.
पालकांना महत्वाची सूचना
या कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पालकांनाही महत्वाच्या सूचना केल्या आहेत. विद्यार्थ्यांना पालकांनी पालकांच्या महत्वाकांक्षांचा बळी ठरवू नये. आपल्या महत्वाकांक्षा त्यांच्यावर लादू नयेत. आपल्या पाल्यांनी एकादी छोटी उपलब्धी जरी साध्य केली, तरी त्यांचे कौतुक केल्यास अधिक मोठी कामगिरी करण्याचा उत्साह त्यांच्या ठायी निर्माण होऊ शकतो. आपल्या अपत्याची तुलना आपण इतरांशी करु नये किंवा आपले अपत्य आपल्या महत्वाकांक्षा पूर्ण करणारे यंत्र आहे, अशी मावना असू नये,. अपत्याचा कल, आवड आणि क्षमता लक्षात घेऊन त्याला त्याची ध्येये निवडण्यास पालकांनी साहाय्य करावे, असे प्रतिपादन त्यांनी केले.
अपयशातूनही शिका, प्रगती करा…
आपण अपयशी ठरलात तरी धीर न सोडण्याची आवश्यकता आहे. वर्गातले यश आणि आयुष्यातले यश यांच्यातील अंतर ओळखण्यास आपण शिकले पाहिजे. एखाद्या परीक्षेत जरी अपयश आले, तरी तो शेवट असे न मानता नव्या जोमाने ध्येयपूर्तीसाठी प्रयत्न केले पाहिजेत. अपयशातूनही बरेच काही शिकता येते. तशी वृत्ती असेल तर, अपयशातूनही यशाचा मार्ग शोधून जीवनात मोठी ध्येये गाठता येतात, असाही महत्वाचा विचार त्यांनी या कार्यक्रमात व्यक्त केला आहे.
काय म्हणाले पंतप्रधान मोदी…
ड पूर्ण करता येतील अशी छोटी छोटी ध्येये स्वत:समोर प्रारंभी असावीत
ड उत्तम यशासाठी मनाची एकाग्रता आणि उत्साह यांचा मेळ आवश्यक
ड पालकांनी विद्यार्थ्यांवर त्यांच्या अपेक्षांचे ओझे टाकण्याचा मोह टाळावा









