पुणे / प्रतिनिधी :
राज्यातील सर्व कृषी, अकृषी विद्यापीठे, सार्वजनिक अभिमत विद्यापीठे, तांत्रिक विद्यापीठे, स्वायत्त विद्यापीठे, शासकीय शैक्षणिक संस्था, शासन अनुदानित शैक्षणिक संस्था, शासन मान्यताप्राप्त विनाअनुदानित शैक्षणिक संस्था, स्वायत्त शैक्षणिक संस्थांमधील अध्यापक संवर्गातील विषयतज्ज्ञांना महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने (एमपीएससी) सोपवलेली गोपनीय, संवेदनशील कामे दिलेल्या कालमर्यादेत, दर्जात्मक स्वरुपात पूर्ण करून देणे बंधनकारक करण्यात आले आहे. तसेच एमपीएससीने दिलेल्या कालमर्यादेत संबंधित विषयतज्ज्ञांची सेवा उपलब्ध करून देणे संबंधित शैक्षणिक संस्था प्रमुखांना बंधनकारक असल्याचेही स्पष्ट करण्यात आले आहे.
एमपीएससीच्या गोपनीय आणि संवेदनशील कामकाजासाठी काही शैक्षणिक संस्थांमधील संबंधित विषयांतील तज्ञांची सेवा उपलब्ध करून घेताना आवश्यक सहकार्य मिळत नसल्याचे निदर्शनास आले आहे. त्याचा परिणाम परीक्षांच्या वेळापत्रकावर होऊन शासन सेवेत कामकाज करण्यासाठी आवश्यक उमेदवार वेळेवर मिळू शकत नाहीत. त्यामुळे पुरेशा मनुष्यबळाअभावी शासकीय कामकाजाच्या गतिमानतेवर परिणाम होतो. त्यामुळे एमपीएससीच्या कामकाजाशी संबंधित बाबींचा समावेश अत्यावश्यक सेवेत करण्याची मागणी एमपीएससीने राज्य शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाकडे गेल्यावषी केली होती. या पार्श्वभूमीवर सामान्य प्रशासन विभागाने परिपत्रकाद्वारे आदेश दिले.
एमपीएससीच्या गोपनीय आणि संवेदनशील कामासाठी शैक्षणिक संस्थांमधील संबंधित विषयातील तज्ज्ञांच्या सेवा गरजेनुसार संबंधित तज्ज्ञांशी थेट संपर्क साधून एमपीएससीकडून परस्पर उपलब्ध करून घेण्यात येतात. या कामासाठी तज्ज्ञांना एमपीएससीकडून शासनमान्य दराने दैनिक आणि प्रवास भत्त्याव्यतिरिक्त निश्चित केलेल्या दरानुसार मानधनही दिले जाते. एमपीएससीमार्फत केली जाणारी भरती प्रक्रिया राज्य शासनाच्या सेवेतील पदांवर सुयोग्य उमेदवारांची पारदर्शक आणि निकोप पद्धतीने निवड करण्यासाठी राबवण्यात येते. त्यामुळे संबंधित कामकाज एमपीएससीला निश्चित कालमर्यादेत करता येण्यासाठी राज्यातील कृषी विद्यापीठे, अकृषिक विद्यापीठे, सार्वजनिक विद्यापीठे, तांत्रिक विद्यापीठे, स्वायत्त विद्यापीठे, शासकीय शैक्षणिक संस्था, शासन अनुदानित शैक्षणिक संस्था, शासन मान्यताप्राप्त विनाअनुदानित शैक्षणिक संस्था, स्वायत्त शैक्षणिक संस्थांतील शैक्षणिक संस्थाप्रमुख, संबंधित विषय तज्ञांनी एमपीएससीला आवश्यक ते सहकार्य करण्याबाबत स्पष्ट करण्यात आले आहे.







