उत्तर प्रदेशमध्ये मिनीबसची ट्रकला धडक ः 9 जणांची प्रकृती चिंताजनक
बहराईच / वृत्तसंस्था
कर्नाटकमधून देवदर्शनासाठी अयोध्येला निघालेल्या भाविकांच्या मिनीबसला रविवारी उत्तर प्रदेशात बहराइचमधील नानपारा लखीमपूर खेरी रोडवर अपघात झाला. या दुर्घटनेत 7 जणांचा मृत्यू झाला असून 9 जणांची प्रकृती चिंताजनक आहे. त्यांना जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मृतांमध्ये चार पुरुष आणि तीन महिलांचा समावेश असून ते कर्नाटकमधील बिदर जिल्हय़ातील रहिवासी असल्याची माहिती प्राप्त झाली आहे.
उत्तर प्रदेशात मोतीपूर पोलीस स्टेशन हद्दीतील नानपारा लखीमपूर रोडवरील नैनिहाजवळ रविवारी पहाटे साडेपाच वाजण्याच्या सुमारास दुर्घटना घडली. मिनी बस आणि मालवाहू ट्रकची भीषण टक्कर झाली. ही टक्कर इतकी जोरदार होती की मिनीबस ट्रकला धडकल्यामुळे दर्शनी भागाचा चक्काचूर झाला आहे. धडकेनंतर मिनीबसमध्ये प्रवासी अडकून पडल्यामुळे कटरने कापून मृतदेह व जखमींना बाहेर काढण्यात आले. मिनी बसमधील 7 जणांचा मृत्यू झाला असून हे सर्व लोक कर्नाटकातून अयोध्येला जात होते. मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी पाठवण्यात आले आहेत. त्याचबरोबर जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. याबाबत नातेवाईकांना माहिती देण्यात आली आल्याचे अतिरिक्त पोलीस अधीक्षक अशोक कुमार यांनी सांगितले. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी या दुर्घटनेबद्दल शोक व्यक्त केला आहे.
पहाटेच्यावेळी अपघात
पहाटे साडेपाचच्या सुमारास हा अपघात झाला. नानपारा महामार्गावर दोन्ही वाहने भरधाव वेगाने येत होती. अचानक एका वळणावर दोन्ही चालकांचा वाहनावर ताबा न राहिल्याने वाहनांची समोरा-समोर धडक झाल्याचे मदत व बचावकार्यात गुंतलेल्या स्थानिकांनी स्पष्ट केले. लोकांनी थांबून मिनी बसमध्ये अडकलेल्या लोकांना बाहेर काढण्यास सुरुवात केली. पहाटेच्यावेळी अंधुक प्रकाशात अपघात झाल्याने मार्गावरून रहदारी करणाऱया वाहनांमधील लोकांनीही मदतकार्य केले. या अपघातात मिनीबसचे मोठे नुकसान झाले. तसेच याठिकाणी यापूर्वीही अनेकदा अपघात होत असल्याचे स्थानिक नागरिकांनी सांगितले.









