समय बड़ा बलवान फकीरा
समय बड़ा बलवान
रहिय हाथ तब लगै मशक है
उडै दूर तब प्राण फकीरा
समय बड़ा बलवान…
वेळेची किंमत या जगात कुणाला कळली असेल तर ती संतांना. कालचक्र आपल्या ठरलेल्या गतीने फिरत असतं. काहीही केलं तरी गेलेली वेळ परत आणता येत नाही. कितीही प्रयत्न केले तरी कालचक्र मागे फिरवता येत नाही. म्हणून हाती असलेल्या वेळेत चांगल्यात चांगलं काय करता येईल याचा विचार आणि तशी कृती करावी लागते. वेळेची एक मोठी गंमत अशी असते. आपल्या मनासारखं घडत असेल तर काळ पुढे गेला कसा हे कळतच नाही. आणि जेव्हा अप्रिय घटना घडत असतील तेव्हा मात्र वेळ सरता सरत नाही. प्रिय व्यक्तीची वाट पाहतानाही असंच होतं. बाहेरून घरी येताना पण हेच होतं. आपल्याला वाटतं की गाडी किती हळूहळू जाते आहे! तेच घरातून बाहेर पडल्यानंतर मात्र आवरताना किंवा गंतव्य ठिकाणी पोचण्याच्या नादात वेळ गेला कसा ते समजून येत नाही. फरक पडत असतो तो आपल्या मनाच्या गतीत. काळाची गती तर ठरलेली असते. निश्चित नसते ती मनाची गती. खरं तर मन काळाशी क्वचितच जुळवून घेत असावं. ते आपल्याच नादात असतं. ते आपल्या हिशेबाने काळवेळ मापतं म्हणून तर त्याची फजिती होते.
पल पल ओ पल पल
समय तू धीरे धीरे चल
सारी दुनिया छोड़ के पीछे
आगे जाऊँ निकल…
मैं तो आगे जाऊँ निकल
असं कितीही म्हटलं तरी काळ त्याची गती सोडणार थोडाच आहे? आपण आपलं समाधान करून घ्यायचं असतं एवढंच.. ‘कर्मा’ मधलं हे गाणं म्हणजे मनाच्या लहरींचा काळाच्या अक्षुण्ण गतीशी असलेला आट्यापाट्या… त्या चित्रपटाची कथाही काळजाला चटका लावून जाणारी आहे. काळ किती बलवान असतो हे सांगणारी. कथेचं आयुष्य दीर्घ असतं खरं.
देव सगुण निर्गुण देव विश्वाचे कारण
काळ येई काळ जाई, देव आहे तैसा राही
देव देव्हाऱ्यात नाही देव नाही देवालयी
देव चोरून नेईल अशी कोणाची पुण्याई?
बाबूजींचं फार फार सुरेख गाणं. मुळात त्यांचे शब्दांवरचे आघात इतके उत्तम असत, की सुरेल गातानाही ते त्याची मोडतोड होऊ देत नसत. त्यांच्या शब्दांत काळाचं महत्त्व आणि देवाचं कालातीत असणं ऐकायचं म्हणजे अपूर्वाई आहे. गदिमांचे सुसंघटित, नेमके शब्द आणि बाबूजींचं संगीत आणि स्वर म्हणजे प्रीतिसंगमच! काळ ही गोष्ट मोठी गंमतीशीर आहे. त्याबद्दल अनेक पौराणिक कथा ऐकायला मिळतात. त्यातलीच एक कथा म्हणजे बलराम रेवतीची.
रेवती ही सत्ययुगातील रैवतक या राजाची कन्या. तिचा जन्म अग्नीपासून झालेला असून ती अतिशय सुंदर व तेजस्वी होती. तिला पृथ्वीवरील सर्वांत बलशाली वीराशी लग्न करायची इच्छा होती. तिच्यासाठी पृथ्वीवर योग्य वर मिळत नसल्याने तिचे वडील तिच्यासह ब्रह्मलोकात गेले. तिथे ब्रह्मदेवाने त्यांना सांगितलं की तुम्ही इथे येण्यापर्यंतच्या काळात युग लोटलं आहे. म्हणजे तांत्रिकदृष्ट्या तुमच्या मुलीचं वय हजारो वर्षे आहे. तरी आता द्वापारयुग सुरू आहे. सध्या श्रीकृष्णाचा ज्येष्ठ बंधू बलराम हा पृथ्वीवरील सर्वांत बलशाली पुरुष आहे. त्याला तुझी कन्या दे. आणि राजानं देवाच्या आज्ञेनुसार केलं. काळाचा हा केवढा मोठा पैलू आहे! म्हणजे त्या काळच्या लोकांना कालप्रवास अवगत होता असं म्हणावं लागेल. नुसताच नव्हे तर उत्तम अवगत होता. त्यातून घडलेली ही गंमत आहे. कालप्रवास ही आजही आपल्यासाठी भविष्यातील गोष्ट आहे. पण तेव्हा आपण इतकी प्रगती करून झालेली होती. काळवेळ सांगून येत नाही म्हणून सावध रहावं म्हणतात. तसंच काळ आला होता पण वेळ आली नव्हती असंही जिवावरच्या संकटातून वाचलेल्यांसाठी म्हटलं जातं. हा काळ म्हणजे मृत्यु. जिवाचा काळप्रवास थांबतो. किंवा त्याच्या काळाची गती आणि मिती बदलते म्हणून मृत्यूला कालपुरुष म्हणतात. शंकर ही देवता लयाचं किंवा कालदेवतेचं प्रतीक आहे. म्हणून त्याच्या एका रूपाला कालभैरव असंही म्हणतात. हा सारा कालमहिमा आहे. काळ ही संकल्पना वापरून एक अप्रतिम जाहिरात तयार केली गेली होती. त्याचे शब्द असे होते,
कल भी आज भी, आज भी कल भी
इन यादों का सफर तो, छूटे ना कभी
अगदी बरोबर ओळखलंत. ही जाहिरात होती व्हीआयपी बॅग्सची. तिची जिंगल ही त्या बिननेटच्या जुन्या काळात गेमचेंजर ठरली. तिनं उच्च मध्यमवर्गीय लोकांमध्ये व्हीआयपीचा अक्षरश: ट्रेंड सेट केला होता. आणि आजही ही कंपनी नाव आणि तितकीच लोकप्रियता राखून आहे. सुंदर सुरेल जाहिरातीतून काळाच्या कसोटीवर आम्ही कसे टिकून राहतो याची केलेली जाहिरात खरी ठरत गेली आणि तेच गुडविल झालं. काळाच्या पायऱ्यांचा केलेला किती सुंदर वापर आहे हा! पृथ्वीच्या वेगवेगळ्या भागात वेगवेगळ्या वेळा सेट केलेल्या असतात. आपल्या देशांतही पूर्वोत्तर भारतासाठी वेगळ्या टाइमझोनची मागणी केली जात आहे. कारण भारतीय प्रमाणवेळेपेक्षा तिथलं काळाचं घड्याळ खरंच वेगळं आहे. एकदम चार वाजता उजाडायला लागणे आणि संध्याकाळी चार वाजताच मावळणे या गंमती तिथे घडत असतात. या भौगोलिक परिस्थितीमुळे वेगळा टाइम झोन ही त्यांची गरज आहे. पण विमानप्रवास करत असताना या काळाची आणि वेळेची अगणित रूपं पाहायला मिळतात. 1800ओ अंश रेखावृत्तावरील काल्पनिक रेषा ही वाररेषा आहे. पूर्वेकडे म्हणजे आशियाकडून अमेरिकेकडे जाताना ही रेषा ओलांडली, तर चालू असेल त्याच्या मागचा वार धरतात आणि पश्चिमेकडे, अमेरिकेकडून आशियाकडे किंवा
ऑस्ट्रेलिया-न्यूझीलंडकडे जाताना पुढचा वार धरतात. म्हणजे आपल्याकडे 5 तारखेचे सकाळचे 6 वाजले असतील तर अमेरिकेत 4 तारखेचे संध्याकाळचे 6 वाजलेले असतात. हे झालं भौगोलिक सत्य. पण
कुठे थांबतो काळ जीवनी
त्याच्या संगे चालत जावे
या जन्मीचे भोग भोगुनी
आयुष्य कसे हसत जगावे
असं आमच्या सावंतवाडीचे कवी दीपक पटेकर यांनी म्हणून ठेवलं आहे. थोर थोर राजे, महाराजे, शत्रू ज्यांची भीती बाळगत, घनघोर रणगर्जना करणारे, रणात कीर्ती संपादन करणारे सारेच्या सारे आज केवळ कथामात्र उरलेत.
जे जे महाभाग आपल्याला अत्यंत थोर वाटत होते त्यांची कीर्ती यावश्चंद्रदिवाकरौ राहील वाटत होते ते ते सारे विस्मृतीच्या खोल गर्तेत गेले. खरोखर रसिका, स्वत:च्या अनुभवाने पाहा. अरे फार काय वीस-पंचवीस वर्षांपूर्वी जी माणसे आपल्याला मोठी वाटत होती ती काळाच्या प्रभावात आज खुजी वाटू लागतात. म्हणून रॉय किणीकर म्हणतात,
या पाणवठ्यावर आले किती घट गेले
किती डुबडुबले अन् बुडले वाहुनी गेले
किती पडुन राहिले तसेच घाटावरती
किती येतील अजुनी त्यांना नाही गणती..
काळ वाहतोच आणि तो राहतोच… मोठमोठे राजे महाराजे होतात आणि जातात. कोसळलेली घरं ऊर्जितावस्थेला येतात. भरभराट झालेली घरं एकाएकी ऱ्हास होऊन काळाच्या उदरात गडप होतात. काळापेक्षा मोठा असेल तर फक्त देव. बाकी काही नाही. म्हणून म्हणतात,
समय बड़ा बलवान…
-अॅड. अपर्णा परांजपे-प्रभु








