कौलवमध्ये भीषण अपघात; भाऊ-बहिणीसह तिघांचा दुर्दैवी मृत्यू
कोल्हापूर : कोल्हापूर–राधानगरी रोडवरील कौलव येथे मंगळवारी सकाळी दुचाकी आणि टेम्पोच्या अपघातात तिघांचा मृत्यू झाला, तर दोघेजण गंभीर जखमी झाले. ऐन दिवाळीच्या काळात झालेल्या या अपघातामुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
मृतांमध्ये श्रीकांत बाबासो कांबळे (रा. तरसबळे, ता. राधानगरी) आणि त्यांची बहीण दिपाली गुरुनाथ कांबळे (रा. शेंडूर, ता. कागल) यांचा समावेश आहे. अपघातात अथर्व गुरुनाथ कांबळे आणि कौशिकी सचिन कांबळे हे दोघे गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
प्राथमिक माहितीनुसार, श्रीकांत कांबळे हे आपल्या बहिणीसह दिवाळीच्या खरेदीसाठी भोगावती येथे गेले होते. बाजारहाट आटोपून परत येत असताना कौलवजवळ चुकीच्या दिशेने भरधाव वेगाने आलेल्या टेम्पोने त्यांच्या दुचाकीस जोरदार धडक दिली. या भीषण धडकेत श्रीकांत व दिपाली यांचा जागीच मृत्यू झाला, तर मागील सीटवर बसलेली कौशिकी व अथर्व हे गंभीर जखमी झाले.
अपघातानंतर टेम्पोचालक घटनास्थळावरून फरार झाला. अपघातस्थळी मोठी गर्दी झाल्याने वाहतूक विस्कळीत झाली होती. पोलिस घटनास्थळी दाखल झाले असून पुढील तपास सुरु आहे.








