तिसऱ्या टी 20 सामन्यात कांगारुंकडून विंडीज पराभूत : मालिकेत 3-0 ने आघाडी
वृत्तसंस्था/ बससेटेर (वेस्ट इंडिज)
उंचपुऱ्या आणि ताकदवान टीम डेव्हिडच्या 37 चेंडूत नाबाद 102 धावांच्या झंझावाती खेळीच्या जोरावर ऑस्ट्रेलियाने वेस्ट इंडिजवर तिसऱ्या टी 20 लढतीत दमदार विजय मिळवला. विंडीजने दिलेल्या 215 धावांच्या लक्ष्यासमोर खेळताना ऑस्ट्रेलियाची 61/3 अशी स्थिती होती. मात्र यानंतर टीम डेव्हिडने अवघ्या अर्ध्या तासात सामन्याचे चित्रच पालटले. ऑस्ट्रेलियाने 6 विकेट्स आणि 23 चेंडू राखून विजयी लक्ष्य पार केले. संस्मरणीय शतकी खेळीसाठी टीमलाच सामनावीर पुरस्काराने गौरवण्यात आले.
प्रारंभी, शाय होपचे दमदार शतक आणि ब्रेडाँन किंगच्या अर्धशतकी खेळीच्या जोरावर विंडीजने 20 षटकांत 4 गडी गमावत 214 धावा केल्या. होप व किंगने 125 धावांची सलामी दिली. यादरम्यान, किंगने 36 चेंडूत 3 चौकार आणि 6 षटकारासह 62 धावा फटकावल्या. यानंतर होपने नाबाद शतकी खेळी साकारताना 57 चेंडूत 8 चौकार व 6 षटकारासह नाबाद 102 धावांची खेळी साकारली. या दोघांचा अपवाद वगळता इतर विंडीज फलंदाज अपयशी ठरले.
टीमचा शतकी धमाका
प्रत्युतरात खेळताना कांगारुंनी 87 धावांत 4 विकेट्स गमावल्या होत्या. कर्णधार मिचेल मार्श (22), मॅक्सवेल (20), जोस इंग्लिश (15) आणि कॅमरुन ग्रीन (11) हे मोठी खेळी करु शकले नाहीत. संघ अडचणीत असताना फलंदाजीला आलेल्या डेव्हिडने विंडीज गोलंदाजांची तुफानी धुलाई करताना संघाला 16 व्या षटकांतच विजय मिळवून दिला. डेव्हिडने 37 चेंडूत 6 चौकार आणि 11 षटकारासह नाबाद 102 धावांची खेळी केली. त्याला मिचेल ओव्हनने 36 धावा करत मोलाची साथ दिली. यामुळे ऑसी संघाने विजयी लक्ष्य 16.1 षटकांत 4 गड्यांच्या मोबदल्यातच पार केले.
संक्षिप्त धावफलक
वेस्ट इंडिज 20 षटकांत 4 बाद 214 (ब्रेडॉन किंग 62, शाय होप नाबाद 102, रुदरफोर्ड 12, नॅथन एलिस, झम्पा आणि ओव्हन प्रत्येकी 1 बळी)
ऑस्ट्रेलिया 16.1 षटकांत 4 बाद 215 (मिचेल मार्श 22, मॅक्सवेल 20, टीम डेव्हिड नाबाद 102, मिचेल ओव्हान नाबाद 36, शेफर्ड 2 तर होल्डर 1 बळी)









