ऑनलाईन टीम / तरुण भारत :
उस्मानाबादच्या नामांतराविरोधात मुंबई उच्च न्यायालयात रीट याचिका दाखल करण्यात आली आहे. या याचिकेवर सुनावणी सुरू असल्याने पुढील आदेश येईपर्यंत सरकारी कार्यालयांनी उस्मानाबाद नावात बदल करू नये, असे निर्देश धाराशिवचे जिल्हाधिकारी सचिन ओंबासे यांनी दिले आहेत.
याबाबत एक पत्रक जिल्हाधिकारी कार्यलयाकडून काढण्यात आलं आहे. राज्य सरकारने काही दिवसांपूर्वीच उस्मानाबादचं नामांतर धाराशिव आणि औरंगाबादचं नामांतर छत्रपती संभाजीनगर असं केलं आहे. केंद्र व राज्य सरकारचा आदेश आल्यानंतर अनेक सरकारी कार्यालयांनी शहरांच्या नावात बदल केला. मात्र, काही संघटनांनी या नामांतरावर आपेक्ष घेतला आहे. उस्मानाबादच्या नामांतराविरोधात मुंबई उच्च न्यायालयात रीट याचिका दाखल करण्यात आली आहे. त्यावर सुनावणी सुरू आहे. ही सुनावणी पूर्ण होऊन पुढील आदेश येईपर्यंत सरकारी कार्यालयांनी जिल्ह्याच्या नावात बदल करू नये. उस्मानाबाद हेच नाव ठेवावे. न्यायालयाच्या आदेशाचे काटेकोरपणे पालन करावे, असे या पत्रकात म्हटले आहे.








