लोकसभा निवडणूक मतदानाच्या आतापर्यंत झालेल्या चार टप्प्यांच्या मतदानाची अंतिम संख्या केंद्रीय निवडणूक आयोगाने घोषित केली आहे. त्यानुसार या चार टप्प्यांमधील एकंदर सरासरी मतदान 66.95 प्रतिशत इतके झाले आहे. या लोकसभा निवडणुकीत मतदारांची एकंदर संख्या 96 कोटी 90 लाख इतकी आहे. त्यांच्यापैकी आतापर्यंत 45 कोटी 10 लाख मतदारांनी मतदान केले आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाने गेल्या सोमवारी पार पडलेल्या चौथ्या टप्प्यातील मतदानाची अंतिम संख्याही स्पष्ट केली आहे. या टप्प्यात 69.16 टक्के मतदान झाले असून ते 2019 च्या निवडणुकीच्या याच मतदारसंघांच्या तुलनेत 3.65 टक्के अधिक आहे. तिसऱ्या टप्प्यात 65.68 टक्के मतदान झाले असून ते 2019 च्या लोकसभा निवडणुकीच्या तुलनेत 2.72 टक्क्यांनी कमी आहे. दुसऱ्या टप्प्यात (26 एपिलला) एकंदर 66.71 टक्के मतदान झाले. ते 2019 च्या लोकसभा निवडणुकीच्या तुलनेत 3.08 टक्के कमी आहे. 19 एप्रिलला प्रथम टप्प्यात 66.14 टक्के मतदान झाले होते. ते 2019 च्या लोकसभेच्या याच मतदारसंघांमधील मतदानापेक्षा 3.29 टक्के कमी आहे, असे स्पष्ट होत आहे.
मोठे अंतर नाही
2019 च्या निवडणुकीपेक्षा या निवडणुकीत मतदान कमी प्रमाणात झाले, अशी हाकाटी उठविण्यात आली होती. तसेच मतदानातील या घटीमुळे कोणाचा लाभ होणार आणि कोणाची हानी होणार, यासंबंधी बरेच चर्वितचर्वण वृत्तवाहिन्यांवरुन आणि सोशल मिडियावरुन करण्यात येत होते. मात्र, या दोन निवडणुकांमधील मतदानातील अंतर विशेष मोठे नाही. 2019 पासून 2014 पर्यंत मतदारांच्या संख्येत जवळजवळ 8 कोटींची झालेली वाढ लक्षात घेता, यंदाच्या निवडणुकीत मतांच्या संख्येच्या दृष्टीने वाढ झाली आहे, हे दिसून येते. या निवडणुकीच्या मतदानाचा सातवा आणि अंतिम टप्पा पार पडल्यानंतर प्रत्यक्ष मतसंख्या एक कोटीहून अधिक मतांनी वाढल्याचे दिसून येईल, अशी शक्यता आहे.
आयोगाचे आवाहन
मतदानाच्या पाचव्या, सहाव्या आणि सातव्या टप्प्यांमध्ये मतदारांनी अधिकाधिक संख्येने मतदान करावे. तसे केल्यास भारतीय गणतंत्र अत्यंत समर्थ असल्याचा संदेश साऱ्या जगापर्यंत जाईल, असे आवाहन केंद्रीय निवडणूक आयोगाने केले आहे. आयोग मतदानात वाढ व्हावी यासाठी अनेक उपाययोजना करीत आहे. या उपाययोजनांना मतदारांनी उत्स्फूर्त प्रतिसाद द्यावा, अशी सूचना आयोगाने केली.









