उत्तर गोव्यात पाण्याची समस्या उद्भवणार
पणजी : तिलारी धरण कालव्याची दुरूस्ती करण्यात येणार असल्यामुळे गोव्याकडे पाणी घेऊन येणारा कालवा आज मंगळवार 10 ऑक्टोबरपासून 15 डिसेंबर 2023 म्हणजे दोन महिन्यांहून अधिक कालावधीत बंद रहाणार असल्याने उत्तर गोव्यात पाण्याची गंभीर समस्या निर्माण होण्याची शक्यता आहे. उत्तर गोव्यातील बहुतांश शेती, बागायती तसेच पिण्याचे पाणी तिलारी कालव्यावर अवलंबून आहे. जवळपास दोन महिने गोव्याकडे कालव्यातून येणारे पाणी बंद पडणार आहे. त्याला पर्यायी व्यवस्था नसल्याने पाणी कोठून आणावे असा प्रश्न शेतकरीवर्गाला पडला आहे. तिलारीच्या पाण्यावर अनेक उद्योग, व्यवसायही अवलंबून आहे. त्यांनाही याचा फटका बसणार आहे. त्यामुळे शेतकरीवर्ग चिंताग्रस्त झाला असून पाण्याची समस्या कशी सोडवावी, असा प्रश्न त्यांना पडला आहे.
अंजुणे, अस्नोड्याहून पाणी व्यवस्था
गोव्याचे जलस्त्रोतमंत्री सुभाष शिरोडकर यांनी काल सोमवारी कालवा बंदची माहिती दिली आहे. त्या दुरूस्ती, डागडुजीला गोवा सरकारने मान्यता दिली असून ते काम महाराष्ट्र सरकारतर्फे करण्यात येणार आहे. उत्तर गोव्याला या बंदचा फटका बसणार व काही दिवस पाण्याची समस्या, टंचाई भासू शकते असे मत शिरोडकर यांनी व्यक्त केले आहे. अंजुणे, अस्नोडा प्रकल्पातून पाण्याची समस्या सोडवणार असल्याची ग्वाही त्यांनी दिली आहे. तिलारी धरण कालव्याच्या बांधकामास सुमारे 25 ते 30 वर्षे किंवा त्यापेक्षा जास्त कालावधी झाला असून त्याची दुरूस्ती करणे अत्यावश्यक बनले आहे. अनेक ठिकाणी कालवा फुटतो आणि पाण्याची नासाडी होण्याचे प्रकार वाढले आहेत. त्यावर उपाययोजना म्हणून हे काम आता महाराष्ट्र सरकारचे सार्वजनिक बांधकाम खाते हाती घेणार आहे.









