मोठा पगार सोडून मातीत रमला अमित : साकारल्या नाविन्यपूर्ण गणेशमूर्ती : प्लास्टर ऑफ पॅरिसपेक्षाही हलक्या पॅटर्नच्या गणेशमूर्ती
बेळगाव : मूर्ती साकारण्याची कला कालांतराने हळूहळू लोप पावत चालली आहे. कुंभार व्यवसाय करणाऱ्यांची पुढील पिढी उच्चशिक्षण घेऊन मोठ्या शहरांमध्ये गेल्यामुळे कौशल्य असलेले कारागीर कमी होत आहेत. परंतु, उच्चशिक्षण घेऊनही मोठ्या पगाराची नोकरी सोडून मूर्तीकला जोपासण्याचे काम बेळगावमधील एक युवक करत आहे. मूर्तीकलेला नाविन्यतेची जोड देऊन बऱ्यापैकी आर्थिक कमाई करता येते, हे त्याने सिद्ध केले आहे. अमित कृष्णा कुंभार याचा कुंभारकाम हा वडिलोपार्जित व्यवसाय. अमितने बीएस्सीपर्यंतचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर पुणे गाठले. तेथे चांगल्या पगाराची नोकरी वर्षभर केली. परंतु, लहानपणापासून मूर्तीकलेमध्ये रमलेला अमित नोकरीत कधी रमलाच नाही. त्यामुळे त्याने नोकरीचा राजीनामा देत थेट खानापूर येथील आपले घर गाठले. नोकरी सोडल्याने घरचा आर्थिक गाडा कसा सांभाळायचा, असा प्रश्न त्याच्यासमोर होता. त्यामुळे त्याने खानापूरमध्येच गणेशमूर्ती साकारण्याचे काम सुरू केले. त्यातून त्याला थोडे पैसे मिळाले. खानापूरपेक्षाही बेळगावमध्ये मातीच्या मूर्तींना जास्त मागणी असल्याचे अमितला समजले. त्याच्या मित्रांच्या मदतीने त्याने बेळगावमध्ये मूर्ती तयार करण्यास प्रारंभ केला. पूर्णपणे खानापूरच्या मातीचा वापर करून इकोफ्रेंडली गणेशमूर्ती घडविण्यास त्याने सुरुवात केली. अतिशय सुबक व नाविन्यता दर्शविणाऱ्या मूर्ती त्याने घडविल्याने मागणी वाढत गेली. पहिल्या वर्षी 70 मूर्ती करणाऱ्या अमितने यावर्षी दीडशेहून अधिक मूर्ती साकारल्या आहेत. प्लास्टर ऑफ पॅरिसपेक्षाही वजनाने हलक्या व वेगवेगळ्या पॅटर्नच्या गणेशमूर्ती त्याने घडविल्या आहेत.
मातीपासून साकारल्या हँगिंगच्या मूर्ती
मध्यंतरीच्या काळात मातीच्या गणेशमूर्तींचे वजन अधिक असल्यामुळे गणेशभक्त प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्तींकडे वळले. आपल्याला हव्या त्या पॅटर्नमध्ये प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्ती मिळत असल्याने त्या मूर्तींना मागणी वाढत गेली. परंतु, इकोफ्रेंडली पद्धतीने तयार केलेल्या गणेशमूर्तीही वजनाने हलक्या बनविल्या जाऊ शकतात, हे अमितने आपल्या कलेच्या माध्यमातून दाखवून दिले आहे. आतून पूर्णपणे पोकळ गणेशमूर्ती त्याने साकारल्या आहेत. तसेच ग्राहकांनी दिलेल्या फोटोप्रमाणे मातीमध्ये गणेशमूर्ती त्याने तयार केल्या आहेत. तीन प्रकारची माती एकत्रित करून त्यामधून अप्रतिम मूर्ती साकारण्यात आल्या आहेत.
गणेशोत्सवाला आले व्यावसायिक स्वरुप
काही वर्षांपूर्वी केवळ कुंभार समाज गणेशमूर्ती घडवित होता. परंतु, प्लास्टर ऑफ पॅरिसमुळे आणि तयार साच्यांमुळे जलदगतीने मूर्ती घडविण्यात येत असल्यामुळे याला हळूहळू व्यावसायिक स्वरुप प्राप्त झाले. सध्या तर कोल्हापूरमधून तयार मूर्ती आणून त्या बेळगावमध्ये विक्री करण्याचा पायंडा पडला आहे. परंतु, यामुळे स्थानिक मूर्तिकारांना काम मिळेनासे झाले . हातात कौशल्य असतानाही मोठ्या मूर्तिकारांसोबत व्यावसायिक स्पर्धा करावी लागत असल्याने स्थानिक मूर्तिकार अडचणीत सापडले आहेत. त्यामुळे गणेशमूर्ती घडविण्याला आता व्यावसायिक स्वरुप प्राप्त झाले आहे.
मातीच्या मूर्तींना वाढती मागणी
प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्ती पाण्यामध्ये लवकर विरघळत नसल्यामुळे प्रदूषणाचा मुद्दा उपस्थित होतो. त्यामुळे मागील पाच-सहा वर्षांत इकोफ्रेंडली माती अथवा शाडूच्या मूर्तींना मागणी वाढली आहे. मातीच्या मूर्तींना तडा जातो, असा एक अनुभव मूर्तिकार व्यक्त करतात. परंतु, माती चांगल्याप्रकारे फिल्टर केली आणि त्यामध्ये इतर माती मिसळल्यास मूर्तीला तडा जात नसल्याचे अमितने सांगितले. मूर्तीकला जिवंत ठेवायची असेल तर मातीच्या मूर्तींशिवाय पर्याय नसल्याचे तो म्हणाला.









