बेळगाव : फिनिक्स पब्लीक स्कूल-होनगा यांच्यावतीने 26 व्या फिनिक्स सप्ताहनिमित्त आयोजित फिनिक्स चषक 17 वर्षांखालील आंतरशालेय क्रिकेट स्पर्धेच्या अंतिम सामन्यात ठळकवाडी संघाने ज्ञानप्रबोधनचा 8 गड्यांनी पराभव करुन फिनिक्स चषक पटकाविले. विराज बस्तवाडकर-ठळकवाडी याला ‘सामनावीर’ तर पार्थ उचगावकर-ज्ञानप्रबोधनला मालिकावीराने गौरविण्यात आले. होनगा येथील फिनिक्स मैदानावर आयोजित केलेल्या अंतिम सामन्याचे उद्घाटन रविंद्र हलकर्णी, सौम्या बरनट्टी यांच्या हस्ते नाणेफेक करुन झाले. ज्ञान प्रबोधन मंदिरने प्रथम फलंदाजी करताना 20 षटकात गडी बाद 109 धावा केल्या. पार्थ उचगावकरने 2 षटकार 4 चौकारासह 41, अथर्वने 12 धावा केल्या. ठळकवाडीतर्फे वेदांत पोटेने 17 धावांत 3 तर विराज बस्तवाडकरने 14 धावांत 2 गडी बाद केले.
प्रत्युत्तरादाखल खेळताना ठळकवाडीने 18.4 षटकात 2 बाद 110 धावा करुन सामना 8 गड्यांनी जिंकला. प्रज्योत उघाडेने 2 चौकारांसह 22, विराज बस्तवाडकरने नाबाद 27 तर कृष्णा सुतारने 1 षटकार 1 चौकारांसह 16 धावा केल्या. ज्ञान प्रबोधनतर्फे पार्थ उचगावकर व अद्वैत यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केला. बक्षीस वितरण प्रसंगी बँक ऑफ इंडियाचे व्यवस्थापक शेर्ली डी. पपु, प्रा. विद्या वग्गन्नावर, उपप्राचार्य रामेश्वरी छाब्रिया, डेव्हीड अब्राहम, महांतेश गवी यांच्या उपस्थितीत विजेत्या ठळकवाडी व उपविजेत्या ज्ञानप्रबोधनला चषक, पदके देवून गौरविण्यात आले. उत्कृष्ट फलंदाज कृष्णा सुतार-ठळकवाडी, उत्कृष्ट गोलंदाज ज्ञानेश्वर-ठळकवाडी, मालिकावीर पार्थ उचगावकर-ज्ञानप्रबोधन यांना चषक देवून गौरविण्यात आले. पंच म्हणून सुनील देसाई व महांतेश गवी यांनी काम पाहिले. ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी अरुण कांबळे व इतर पदाधिकाऱ्यांनी परिश्रम घेतले.









