पाच लाखांचा ऐवज जप्त
बेळगाव : एका अट्टल घरफोड्याला अटक करून टिळकवाडी पोलिसांनी पाच लाख रुपयांचा ऐवज जप्त केला आहे. घरफोडीत चोरलेले दागिने फायनान्समध्ये ठेवून त्याने पैसे काढल्याचे पोलीस तपासात उघडकीस आले आहे. विठ्ठल फकिराप्पा कुरबर, रा. संपगाव असे त्याचे नाव आहे. पोलीस आयुक्त यडा मार्टिन मार्बन्यांग, उपायुक्त पी. व्ही. स्नेहा, खडेबाजारचे एसीपी शेखरप्पा यांच्या मार्गदर्शनाखाली टिळकवाडीचे पोलीस निरीक्षक परशराम पुजेरी, उपनिरीक्षक संतोष दळवाई, महेश पाटील, सोमलिंग करलिंगन्नावर, संजू संगोटी, मल्लिकार्जुन पात्रोट, लाडजीसाब मुल्तानी, तांत्रिक विभागाचे रमेश अक्की, महादेव काशिद आदींनी ही कारवाई केली आहे. टिळकवाडी पोलीस स्थानकाच्या कार्यक्षेत्रात विठ्ठलने चोऱ्या केल्याची कबुली दिली असून पोलिसांनी त्याची कसून चौकशी केली असता चोरलेले दागिने मुथ्थुट फायनान्समध्ये ठेवून 4 लाख 80 हजार रुपये काढल्याची कबुली त्याने दिली. पोलिसांनी 40 ग्रॅमचे गंठण, 30 ग्रॅमच्या दोन बांगड्या, 10 ग्रॅमची कर्णफुले व गुन्ह्यासाठी वापरलेली मोटारसायकल असा एकूण 5 लाख 2 हजार रुपये किमतीचा ऐवज जप्त केला आहे.









