केएससीए 16 वर्षांखालील क्रिकेट स्पर्धा
बेळगाव : कर्नाटक राज्य क्रिकेट संघटना मान्यता प्राप्त, धारवाड विभागीय क्रिकेट संघटना आयोजित 16 वर्षांखालील आंतरक्लब क्रिकेट स्पर्धेत आनंद अकादमीने के. आर. शेट्टी लायाज संघाचा 9 गड्यांनी पराभव करुन तर टिळकवाडी क्रिकेट कोचिंग अकादमीने सिग्नीचर स्पोर्ट्स क्लबचा 40 धावांनी पराभव करुन प्रत्येकी चार गुण मिळविले. अथर्व करडी, समर्थ कोकणेला सामनावीर पुरस्कार देण्यात आला.
केएससीए ऑटोनगर येथील टर्फ मैदानावर खेळविण्यात आलेल्या सामन्यात के. आर. शेट्टी लायाज क्रिकेट संघाने प्रथम फलंदाजी करताना 23.2 षटकात 9 गडी बाद 48 धावा केल्या. सिद्धार्थ अधिकारीने 2 चौकारासह 15 धावा केल्या. या व्यतिरिक्त एकही फलंदाज दुहेरी धावसंख्या गाठू शकला नाही. आनंद अकादमीतर्फे अथर्व करडीने 6-6 गडी बाद केले. तर त्याला अद्वैत चव्हाण, आरुश देसूरकर यांनी प्रत्येकी 1 गडी बाद करुन सुरेख साथ दिली. प्रत्युत्तरादाखल खेळताना आनंद अकादमीने 15.5 षटकात 1 गडी बाद 49 धावा करुन सामना 9 गड्यांनी जिंकला. स्कंद शेट्टीने 2 चौकारासह 13, आतिश आदीमतने 4 चौकारासह नाबाद 19 धावा केल्या. शेट्टीतर्फे स्वयंम खोतने 1 गडी बाद केला.
दुसऱ्या सामन्यात टिळकवाडी क्रिकेट कोचिंग अकादमीने 48.5 षटकात सर्वगडी बाद 200 धावा केल्या. ओमकार करेहोंडाने 4 चौकारासह 41, समर्थ वाजंत्रीने 30, समर्थ कोकणेने 6 चौकारासह 39, सिद्धार्थ हेडा व सिद्राय काटेरी यांनी प्रत्येकी 16 धावा केल्या. सिग्नीचरतर्फे आदित्य जाधवने 2 तर अथर्व, अद्वैत, समर्थ यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केला. प्रत्युत्तरादाखल खेळताना सिग्नीचर संघाचा डाव 34.2 षटकात 160 धावांत आटोपला. समर्थ पाटीलने 11 चौकारासह 68, अथर्व काकडेने 22 तर देवेन धोंडगीने 14 धावा केल्या. टिळकवाडीतर्फे सिद्धार्थ हेडाने 28-3, समर्थ कोकणे 38-2, समर्थ वाजंत्रीने 26-2, अभिषेक व सिद्धार्थ यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केला.









