अहमदाबादमध्ये तब्बल 11 हजार पोलिसांचा बंदोबस्त, एनएसजी, रॅपिड अॅक्शन फोर्ससह होमगार्ड देखील तैनात
वृत्तसंस्था/ अहमदाबाद
आयसीसी विश्वचषक स्पर्धेत 14 ऑक्टोबर रोजी भारत आणि पाकिस्तान यांच्यात महामुकाबला रंगणार आहे. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर हा सामना खेळवला जाणार आहे. या महायुद्धासाठी सुरक्षा यंत्रणांनीही जबरदस्त तयारी केली आहे. भारत-पाकिस्तान सामन्यादरम्यान स्टेडियमवर गुजरात पोलिस, एनएसजी, आरएएफ आणि होमगार्डसह विविध एजन्सीचे 11 हजारांहून अधिक कर्मचारी तैनात असतील. अहमदाबाद पोलीस अधिकाऱ्यांनी सोमवारी याबाबतची माहिती दिली. दरम्यान, या सामन्याआधी स्टेडिअम उडवून देण्याची धमकी देण्यात आली आहे. सामन्याचा माहोल पाहता स्टेडिअम आणि अहमदाबादला छावणीचे स्वरुप आले आहे. यासाठी एनएसजीचे जवान ठिकठिकाणी तैनात करण्यात आले असल्याचेही वरिष्ठ अधिकाऱ्यांनी यावेळी सांगितले.

विश्वचषक स्पर्धेआधी अहमदाबाद पोलिसांना एक ईमेलद्वारे भारत-पाकिस्तान सामन्यावेळी नरेंद्र मोदी स्टेडिअम बॉम्बने उडवून देण्याची धमकी मिळाली होती. या पार्श्वभूमीवर सुरक्षा व्यवस्था चोख करण्यात आली आहे. स्टेडिअमध्ये वादग्रस्त असतील बॅनर घेऊन जाण्यासही बंदी घालण्यात आली आहे. प्रेक्षकांच्या हातातील प्रत्येक बॅनर आणि पोस्टरची तपासणी केली जाईल. स्टेडियमची सुरक्षा आणि शहरातील संवेदनशील भागात कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी सामन्यादरम्यान सुमारे 4,000 होमगार्ड आणि 7,000 हून अधिक पोलिस कर्मचारी तैनात केले जातील. या जवानाव्यतिरिक्त, आम्ही तीन एनएसजी ‘हिट टीम’ आणि एक ड्रोन विरोधी टीम तैनात करण्यात आली आहे. तसेच नऊ बॉम्बशोधक पथके ठिकठिकाणी तैनात करण्यात आली असून रॅपिड अॅक्शन फोर्स, होमगार्ड, एनडीआरएफचे जवानही सुरक्षेसाठी सज्ज असणार आहेत. महानिरीक्षक आणि उपमहानिरीक्षक दर्जाचे चार वरिष्ठ अधिकारी आणि पोलिस उपायुक्त दर्जाचे 21 अधिकारी सामन्याच्या दिवशी कर्मचाऱ्यांना मार्गदर्शन करतील, अशी माहिती अहमदाबादच्या पोलिस आयुक्तांनी दिली. तसेच, सामन्यादरम्यान शहरात रासायनिक, जैविक, रेडिओलॉजिकल आणि न्यूक्लियर आणीबाणीसाठी राज्य आपत्ती प्रतिसाद दल आणि राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलच्या टीम देखील तैनात केल्या जातील, असेही पोलिस आयुक्तांनी यावेळी सांगितले. सर्व यंत्रणा सामन्याच्या आधी तीन दिवस अलर्ट मोडवर असणार असून स्टेडियमवर दोन्ही संघांना कडेकोट सुरक्षा व्यवस्था पुरवण्यात आले असल्याचे त्यांनी सांगितले.
नरेंद्र मोदी स्टेडियमवर होणार ओपनिंग सेरेमनी
भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामना पाहण्यासाठी येणाऱ्या चाहत्यांसाठी आनंदाची वार्ता असून या सामन्यावेळी ओपनिंग सेरेमनी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार असल्याची माहिती खात्रीलायक सूत्रांनी दिली आहे. यामध्ये लाइट शो, डान्स परफॉर्मेंस आणि प्रसिद्ध गायक अरिजीत सिंह यांचा लाइव्ह परफॉर्मेंस होणार आहे. याशिवाय सामन्यावेळी खास सेलिब्रेटिंनाही आमंत्रित करण्यात आले आहे. त्यामध्ये मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर, अमिताभ बच्चन आणि रजनीकांत यांच्यासारख्या दिग्गजांचा समावेश आहे. या सामन्यापूर्वी रंगारंग कार्यक्रम पाहायला मिळू शकतो. भारत-पाकिस्तान सामन्याच्या दिवशी दुपारी 12.30 वाजता अरिजित सिंहचा कार्यक्रम सुरू होईल. तर दुपारी 2 पासून भारत आणि पाकिस्तान यांच्यात सामना रंगणार आहे. बीसीसीआय यासाठी विशेष योजना आखत असल्याची माहिती सूत्रांनी यावेळी दिली.
हायव्होल्टेज सामन्यासाठी भारतीय रेल्वेही सज्ज
जगभरातील क्रिकेट चाहत्यांचे लक्ष भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामन्यावर आहे. 14 ऑक्टोबर रोजी हा सामना अहमदाबाद येथे खेळला जाईल. या सामन्यासाठी आता बीसीसीआयसह भारतीय रेल्वे देखील सज्ज झाली आहे. हा सामना पाहण्यासाठी महाराष्ट्रातील चाहत्यांना अहमदाबाद येथे जाता यावे याकरिता पश्चिम रेल्वेने दोन विशेष वंदे भारत एक्सप्रेसची सोय केली आहे. महत्त्वाचे म्हणजे भारतीय क्रिकेटच्या इतिहासात क्रिकेट सामन्यासाठी अशा प्रकारे विशेष रेल्वे गाड्या सुरू करण्याची ही पहिली वेळ आहे. महाराष्ट्र आणि मुंबईतील चाहत्यांना भारत-पाक सामना पाहता यावा यासाठी पश्चिम रेल्वेने 13 ऑक्टोबरच्या रात्री आणि 14 ऑक्टोबरच्या पहाटे या गाड्या सोडण्याचा निर्णय घेतला आहे. 13 ऑक्टोबर रोजी रात्री दहा वाजता पहिली गाडी सोडली जाईल. ही गाडी पहाटे सहा वाजता अहमदाबाद येथे पोहोचेल. तर, दुसरी गाडी पहाटे पाच वाजता सोडल्यानंतर दुपारी बारापर्यंत अहमदाबादमध्ये पोहचेल.
पाक पत्रकारांना मिळाला व्हिसा
दरम्यान, उभय संघातील महामुकाबला पाहण्यासाठी पाकिस्तानातून तब्बल 60 पत्रकार भारतात येणार आहेत. या 60 पत्रकारांना व्हिसा मंजूर झाला आहे. याआधी पाक खेळाडू व सपोर्ट स्टाफ यांना व्हिसा मंजूर झाला होता, पण ही लढत पाहण्यासाठी पाक पत्रकार देखील भारतात येणार आहेत. याशिवाय, या लढतीसाटी पीसीबी अध्यक्षही भारत दौऱ्यावर येणार असल्याचे सूत्रांनी सांगितले आहे.









