कोल्हापूर :
लॉरी ऑपरेटर असोसिएशनने कागल चेक पोस्टच्या विरोधात वाहनांसह धरणे आंदोलनाचा इशारा दिला होता. शाहू नाक्यापासून ते वाहनांसह रॅलीने कागल चेक पोस्टकडे जाणार होते. दरम्यान, या आंदोलनाला पोलिसांनी परवानगी दिली नाही. तसेच सोमवारी शाहू नाका येथे दिवसभर पोलिसांचा चोख बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.
कागल तालुका येथील खासगी आरटीओ चेक पोस्ट (बॉर्डर) सुरू होणार असल्याची चर्चा आहे. कोल्हापूर डिस्ट्रिक्ट लॉरी ऑपरेटर असोसिएशनचा यास तीव्र विरोध आहे. चेक पोस्ट सुरू करू नये म्हणून त्यांनी जिल्हाधिकारी, पोलिस प्रशासनाला निवेदन दिले. यानुसार जिल्हाधिकारी कार्यालयात तसेच प्रादेशिक परिवहन विभागामध्ये या संदर्भात बैठक झाली. यावेळी लॉरी ऑपरेटर असोसिएशनने खासगी चेक पोस्टला विरोध दर्शवला. प्रशासनाकडून कोणतेच ठोस उत्तर मिळाले नसल्याने चेकपोस्टच्या विरोधात सोमवारी कागल येथील चेकपोस्टच्या ठिकाणी दोन तास वाहनांसह धरणे आंदोलन करण्याचा निर्णय घेतला होता. सोमवारी सकाळी 10 वाजता शाहू नाका येथून कागल चेकपोस्ट अशी वाहनांची रॅली काढली जाणार होती. तसेच सकाळी 11 ते दुपारी 1 दरम्यान दोन तास कागल चेकपोस्ट येथे वाहनांसह धरणे आंदोलन करण्यात येणार होते. दरम्यान, रविवारी रात्रीच पोलिस प्रशासनाने लॉरी ऑपरेटर असोसिएशनचे अध्यक्ष सुभाष जाधव आणि सेव्रेटरी हेमंत डिसले यांना ताब्यात घेतले. तसेच सोमवारी सकाळी 9 वाजल्यापासूनच शाहू नाका येथे पोलिसांचा फौजफाटा तैनात करण्यात आला होता. यावेळी 200 हून अधिक पोलिस दिवसभर येथे थांबून होते. कागलकडे जाणारे ट्रकची तपासणी करूनच सोडण्यात आले.
आंदोलन चिरडल्याचा आरोप
धरणे आंदोलनास परवानगी नाकारून असोसिएशनच्या अध्यक्ष, सेक्रेटरी यांना पोलिसांनी ताब्यात घेऊन आंदोलन चिरडण्याचा प्रकार केल्याचा आरोप सेशलमिडीयावर असोसिएशनचे पदाधिकारी सदस्यांकडून करण्यात आला.








