हिंस्त्र प्राण्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी
वार्ताहर/जांबोटी
कणकुंबी-पारवाड रस्त्यावर बुधवारी सायंकाळी पारवाड गवळी वाड्यानजीक एका दुचाकीस्वाराला पट्टेरी वाघाचे दर्शन झाल्यामुळे या परिसरातील नागरिकांमध्ये घबराट पसरली आहे. कणकुंबी-पारवा हा रस्ता संपूर्ण जंगलमय प्रदेशातून गेला असला तरी, या रस्त्यावर दोन्ही गावच्या नागरिकांची मोठ्या प्रमाणात वर्दळ असते. मात्र बुधवारी सायंकाळी 6 वाजता या रस्त्यावर पारवाड गवळीवाड्यानजीक असलेल्या मंदिराजवळ दुचाकीस्वराला पट्टेरी वाघाचे दर्शन झाल्यामुळे नागरिकांमध्ये घबराट पसरली आहे.
पारवाड ग्राम पंचायतीचे कर्मचारी मिथून साबळे हे बुधवारी सायंकाळी आपले ग्राम पंचायतमधील काम आटोपून आपल्या ओलमणी या मूळ गावाकडे जाण्यासाठी दुचाकीवरून जात असताना सायंकाळी 6 वाजण्याच्या सुमारास त्यांना पारवाड गवळीवाड्यानजीक रस्ता ओलांडणाऱ्या एका पट्टेरी वाघाचे दर्शन झाले. वाघाला पाहताक्षणीच मिथून साबळे यांची भीतीने गाळण उडाली. मात्र, प्रसंगावधान राखून ते दुचाकी बंद करून तेथेच थांबले. त्यानंतर सदर वाघ काही मिनिटातच रस्ता ओलांडून पारवाड, गवळी वाड्याच्या दिशेने निघून गेल्याचे समजते. जांबोटी-कणकुंबी भागांमध्ये गेल्या काही दिवसापासून अनेक ठिकाणी वाघ व इतर हिंस्त्र प्राण्यांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. रात्रीच्या वेळी भक्षाच्या शोधात ते मानवी वस्तीमध्ये देखील प्रवेश करीत असल्यामुळे घबराट पसरली आहे.
हिंस्त्र प्राण्यांच्या मुक्त संचारामुळे भीती
सध्या या भागात सुगीची कामे अंतिम टप्प्यात आहेत. मळणी करण्यासाठी शेतकरी वर्गाचे रात्री उशिरापर्यंत शेतवाडीत वास्तव्य असते. मात्र वाघासारखे हिंस्त्र प्राणी या भागात मुक्त संचार करीत असल्यामुळे शेतकऱ्यात भीतीचे वातावरण असून, कणकुंबी वन विभागाच्या वनक्षेत्रपाल व इतर अधिकारी वर्गाने वाघाचा बंदोबस्त करावा, अशी मागणी होत आहे.









