आठवडाभरात कार्यान्वित : वाघाचे जवळून दर्शन होणार, टायगर सफारीचे स्वप्न पूर्ण
प्रतिनिधी/ बेळगाव
पुणे-बेंगळूर राष्ट्रीय महामार्गाला लागून असलेल्या भुतरामहट्टी येथील राणी चन्नम्मा प्राणीसंग्रहालयातील ‘टायगर सफारी’चे काम पूर्णत्वाकडे आले आहे. पुढील आठवड्यापासून याठिकाणी टायगर सफारी सुरू होणार आहे, अशी माहिती संग्रहालय व्यवस्थापनाने दिली आहे. त्यामुळे पर्यटकांना अगदी जवळून वाघाला पाहण्याचा आनंद लुटता येणार आहे.
म्हैसूर प्राणीसंग्रहालयाच्या धर्तीवर भुतरामहट्टी प्राणीसंग्रहालयाचा विकास साधला जात आहे. या संग्रहालयात सिंह, वाघ, बिबटे, सांबर, तरस, कोल्हे, मोर, मगर, काळवीट, अस्वल, चितळ, हरिण यासह विविध दुर्मीळ पक्षीही दाखल झाले आहेत. त्यामुळे संग्रहालयाला भेट देणाऱ्या पर्यटकांची संख्या वाढली आहे. त्याचबरोबर आता बन्नेरगट्टा, शिमोगा व हंपीनंतर बेळगाव प्राणीसंग्रहालयात टायगर सफारी सुरू होणार आहे.
शहरापासून अवघ्या 12 किलोमीटर अंतरावर असलेल्या या संग्रहालयात टायगर सफारीसाठी तीन वाघ आणण्यात आले आहेत. दरम्यान, टायगर सफारीचे काम पूर्ण झाले नव्हते. त्यामुळे केवळ मिनी टायगर सफारी सुरू करण्यात आली होती. आता टायगर सफारीचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. त्यामुळे लवकरच पर्यटकांना वाघाला अगदी जवळून पाहता येणार आहे. यासाठी संरक्षक कुंपण, गेट आणि इलेक्ट्रीक कारची व्यवस्था करण्यात आली आहे. दरम्यान, दीड किलोमीटर लांबीचा सिमेंटचा रस्ता तयार करण्यात आला आहे. कारमध्ये बसून पर्यटकांना वाघाच्या अगदी जवळ जाता येणार आहे. टायगर सफारीसाठी शुल्क आकारण्यात येत आहे. प्रौढांसाठी 40 रु. तर लहानांसाठी 20 रुपये शुल्क आकारणी केली जाणार आहे.
तब्बल 39 हेक्टर परिसरात पसरलेल्या या प्राणीसंग्रहालयाचा 2018 साली मास्टरप्लॅन तयार करण्यात आला होता. त्यात टायगर सफारीसाठीची योजना समाविष्ट करण्यात आली होती. काही तांत्रिक अडचणींमुळे सफारीला काहीसा विलंब झाला आहे. मात्र, आठवडाभरात टायगर सफारीला प्रारंभ करण्यासाठी हालचाली सुरू झाल्या आहेत.
मंगळवार वगळता इतर सर्व दिवस सकाळी 9.30 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत प्राणीसंग्रहालय खुले ठेवण्यात येणार आहे. प्रौढांना 40 तर लहानांना 20 रुपये प्रवेश शुल्क, त्याचबरोबर दुचाकी पार्किंगसाठी 20 रुपये, चारचाकीसाठी 50 रुपये आकारणी केली जात आहे.
काम एक-दोन दिवसांत पूर्ण होणार
के. एन. वेण्णूर (आरएफओ, प्राणीसंग्रहालय)
टायगर सफारीचे काम एक-दोन दिवसांत पूर्ण होणार आहे. पुढील आठवड्यापासून टायगर सफारी सुरू केली जाणार आहे. यासाठी विशेष इलेक्ट्रीक व्हॅनची व्यवस्था करण्यात आली आहे. पर्यटकांना टायगर सफारीचा आनंद लुटता येणार आहे.









