टायगर सफारीला प्रारंभ, वाघाचे जवळून घेता येणार दर्शन : सफारीसाठी दीड किलोमीटरचा काँक्रिटचा रस्ता तयार
बेळगाव : पुणे-बेंगळूर राष्ट्रीय महामार्गाला लागून असलेल्या भुतरामहट्टी प्राणी संग्रहालयात टायगर सफारीला प्रारंभ झाला आहे. त्यामुळे टायगरप्रेमींना अगदी जवळून वाघाला पाहाण्याचा आनंद लुटता येत आहे. मागील आठवड्यापासून या टायगर सफारीला सुरुवात झाल्याने पर्यटकांचा ओघ वाढू लागला आहे. त्यामुळे एकूण संग्रहालयाच्या उत्पन्नात भर पडली आहे, अशी माहिती संग्रहालय व्यवस्थापनाने दिली आहे. शहरापासून अवघ्या 12 किलोमीटर अंतरावर असलेल्या भुतरामहट्टी येथील राणी चन्नम्मा प्राणी संग्रहालयाचा म्हैसूर संग्रहालयाच्या धर्तीवर विकास साधला जात आहे. दरम्यान संग्रहालयात सिंह, वाघ, हत्ती, बिबटे, सांबर, अस्वल, कोल्हे, तरस, मोर, मगर, काळविट, चितळ, हरीण यांसह विविध पक्षी दाखल झाले आहेत. त्यामुळे बेळगाव, गोवा आणि पश्चिम महाराष्ट्रातील पर्यटक दाखल होऊ लागले आहेत. शाळा, महाविद्यालयांना सुटी पडल्याने कुटुंबांसह संग्रहालयाला भेट देणाऱ्या पर्यटकांची संख्या वाढू लागली आहे. राज्यात बन्नेरघट्टा, शिमोगा व हंपीनंतर बेळगावमध्ये टायगर सफारी सुरू झाली आहे. त्यामुळे बेळगावसह हुबळी, धारवाड येथूनही पर्यटक येऊ लागले आहेत. 39 हेक्टर परिसरात पसरलेल्या या संग्रहालयाचा विकास साधून वन्यप्राणी आणण्यात आले आहेत. तीन वाघ आणून सोडण्यात आले आहेत. तर टायगर सफारीसाठी स्वतंत्र वाघ सोडण्यात आला आहे. शिवाय काचेच्या सुरक्षित इलेक्ट्रीक कारची व्यवस्था करण्यात आली आहे. पर्यटकांना कारमध्ये बसून अगदी वाघाच्या जवळ जाणे शक्य झाले आहे. दीड किलोमीटरचा सिमेंटचा रस्ता तयार करण्यात आला आहे. त्यामुळे पर्यटकांना टायगर सफारी करणे सोयीस्कर होत आहे. टायगर सफारीसाठी प्रौढांना 40 तर लहानांसाठी 20 रुपये शुल्क आकारणी केली जात आहे. प्राणी संग्रहालयाचा 2018 साली मास्टर प्लॅन तयार करण्यात आला होता. तांत्रिक अडचणीमुळे टायगर सफारीला विलंब झाला. मात्र आता सुरळीत टायगर सफारी सुरू झाली आहे. मंगळवार वगळता इतर दिवस सकाळी साडेनऊ ते सायंकाळी 5 यावेळेत संग्रहालय खुले ठेवण्यात येत आहे.
पर्यटकांचा उत्साह वाढतोय
मागील चार दिवसांपासून प्राणी संग्रहालयात टायगर सफारी सुरू झाली आहे. त्यामुळे पर्यटकांचे टायगर सफारीचे स्वप्न पूर्ण झाले आहे. अगदी जवळून वाघाला पाहता येत आहे. त्यामुळे पर्यटकांचा उत्साहही वाढत आहे. शिवाय पर्यटकांची संख्यादेखील हळूहळू वाढू लागली आहे.
– के. एन. वेण्णूर, आरएफओ प्राणी संग्रहालय









