बेळगाव : शहरापासून जवळ असलेल्या भुतरामहट्टी प्राणी संग्रहालयात नवीन 12 वर्षीय वाघीण दाखल झाली आहे. त्यामुळे संग्रहालयात या वाघिणीची डरकाळी घुमणार आहे. संग्रहालयातील वाघांची संख्या आता तीनवर पोहोचली आहे. शिवाय टायगरप्रेमींमध्येही उत्सुकता वाढली आहे. सध्या सुटी असल्याने पर्यटकांचा ओघ वाढू लागला आहे. त्यामुळे वाघिणीला अगदी जवळून पाहता येणार आहे. म्हैसूर येथील प्राणी संग्रहालयातून ‘नित्या’ नावाची वाघीण गुरुवारी दाखल झाली. तिला सध्या स्वतंत्र कोठडीत ठेवण्यात आले आहे. वातावरणाशी जुळवून घेतल्यानंतर पर्यटकांसाठी तिला खुले केले जाणार आहे, अशी माहिती प्राणी संग्रहालय व्यवस्थापनाने दिली. भुतरामहट्टी येथील प्राणी संग्रहालयाचा विकास साधून या ठिकाणी विविध वन्यप्राणी आणण्यात आले आहेत.
मात्र, काही कारणांमुळे मागील दोन वर्षांत दोन सिंह आणि एका वाघिणीचा दुर्दैवी मृत्यू झाला होता. त्यामुळे संग्रहालयातील वाघांची संख्या कमी झाली होती. मात्र, आता पुन्हा एक वाघीण दाखल झाली आहे. 34 एकर परिसरात पसरलेल्या या संग्रहालयाचा 50 कोटीच्या निधीतून विकास साधण्यात आला आहे. शिवाय संग्रहालयात सिंह, वाघ, बिबटे, तरस, अस्वल, मगरी, सांबर, काळवीट यासह विविध दुर्मीळ पक्षीही पाहायला मिळतात. त्यामुळे बेळगावसह महाराष्ट्र आणि गोवा राज्यांतूनही पर्यटक दाखल होऊ लागले आहेत. सध्या उन्हाळी सुटी असल्यामुळे शाळकरी मुले कुटुंबासह दाखल होऊ लागली आहेत. शनिवार, रविवारी आणि शासकीय सुटीदिवशी महसूल वाढू लागला आहे.
टायगर सफारी
वाघाला जवळून पाहता यावे यासाठी संग्रहालयात पर्यटकांसाठी टायगर सफारी सुरू करण्यात आली आहे. यासाठी विशेष वाहनाची व्यवस्था करण्यात आली आहे. या टायगर सफारीलाही पर्यटकांचा प्रतिसाद वाढू लागला आहे.









