परवा ऑस्ट्रेलियाचा सामना सुरू होण्याअगोदर मला क्रिकेट दर्दी मित्राचा फोन आला, तो म्हणत होता क्रिकेट या खेळाची व्याख्या कशी करशील? मी लगेच म्हणालो आपल्या मनात 90 टक्के ज्या संघाबद्दल विजयाची खात्री असते त्याच्या विरुद्ध जे घडतं तेच क्रिकेट. अर्थात हे झालं माझं व्यक्तिगत मत. माझ्या व्यक्तिगत मताशी सर्वांनीच सहमत अपों असं माझा कुठलाही फेर्स नाही. असो. बघाना 1983 ला आपला भारतीय संघ सहलीला जावा तसा इंग्लंडला गेला होता. 25 जून 1983 ला भारताचा डाव 200 च्या आत आटोपल्यानंतर त्यावेळी बऱ्याच श्रोत्यांनी ट्रांजिस्टर बंद केले होते. त्यातला मी पण एक होतो. आणि दुसऱ्या दिवशी समजलं की भारताने एक रोमहर्षक विजय मिळवला. तीच गोष्ट 1992 ला. पाकिस्तानने अचानक विश्वचषकाला गवसणी घातली. 1996 ला ज्या श्रीलंकेला कोणीच गृहीत धरलं नव्हतं त्या श्रीलंकेने झटपट क्रिकेटचे रूपडे बदलत रणतुंगाच्या नेतृत्वात विश्वचषक उंचावला. आणि सर्वात कहर म्हणजे 2019 ला इंग्लंडने मिळवलेला विश्वचषक. न्यूझीलंडच्या मेहनतीवर सामन्यातील सर्वाधिक चौकारामुळे पाणी पडल्याने त्यांना हताश व्हावं लागलं. भारतापाठोपाठ ज्या ऑस्ट्रेलिया संघाला या स्पर्धेच्या विजेतेपदाचा प्रबळ दावेदार मानला जात आहे, त्याच कांगारूंना पहिल्या दोन सामन्यात दारुण पराभव स्वीकारावा लागला. परंतु कालच्या सामन्यात लंकेला पराभूत करत या स्पर्धेत आमचं अस्तित्व कायम आहे हे दाखवून दिलं.
खरं पाहता कालचा सामना दोन्ही संघांना जवळपास मस्ट विन चा सामना होता. यात अनुभव व कौशल्य पणाला लावत कांगारूंनी सामना जिंकला. पाच वेळा विश्वचषक विजेतेपदाचे सेलिब्रेशन करणाऱ्या कांगारूंना अनुभवाची कुठलीही कमतरता नाही. परंतु ज्यावेळी ओळीने तुम्ही दोन सामने हरता आणि तिसऱ्या सामन्यात सर्वस्व पणाला लावून तो जिंकता त्यावेळी त्या सामन्यातील विजयाची चव वेगळीच असते. कांगारूचा संघ हा पक्का व्यावसायिक. प्रतिस्पर्धी संघाला कशाप्रकारे आसमान दाखवावं हे त्यांना चांगलेच ज्ञात आहे. मालिकेत 0-2 च्या पिछाडीनंतरसुद्धा 3-2 असा मिळविलेला नेत्रदीपक विजय आपण कित्येकदा बघितला आहे. असो.
या सामन्यातील विजयामुळे तूर्तास तरी त्यांनी आपले आव्हान कायम ठेवले. अर्थात दुसरीकडे लंकेची हालत बिकट झाली आहे हे वेगळं सांगण्याची गरज नाही. या सामन्यात झाम्पाला सापडलेला सूर ही कांगारूसाठी जमेची बाजू. वॉर्नरची बॅट कधी तळपणार हा मोठा यक्षप्रश्न कांगारुसमोर पडला आहे. ऑस्ट्रेलियाचा संघ वेळ पडल्यास प्रतिस्पर्धी संघातील खेळाडूंचे रक्त मैदानात पाडण्यास मागेपुढे बघत नाहीत. हे दृश्य आपण 1980 च्या दशकात बऱ्याच वेळा बघितले आहे. आठवते ना 1981 मध्ये लेन पास्कोने संदीप पाटीलला जायबंदी केलं होतं, त्यावेळी संदीपची कारकीर्द संपली असे वावडे उठले होते. परंतु तसं काही घडलं नाही ही गोष्ट वेगळी. असा हा ऑस्ट्रेलियन संघ वाघासारखा दोन पावलं मागे जात प्रतिस्पर्धी संघावर कधी झडप टाकेल हे सांगता येत नाही. त्यामुळे ऑस्ट्रेलियाविरुद्धचे उरलेले प्रतिस्पर्धी याची निश्चित दखल घेतील यात शंका नाही. या क्रिकेटमधील विश्वविजेत्या संघाला जर दोन पराभवाला सामोरे जावे लागले तर मात्र त्यांच्या हातात परतीचा नारळ निश्चित मिळेल, यात काहीच शंका नाही. तूर्तास तरी ऑस्ट्रेलियाबद्दल असंच म्हणावं लागेल की, टायगर अभी जिंदा है.!









