चंदनसह धारधार शस्त्रे जप्त : खानापूर वनविभागाची कारवाई
खानापूर : आंतरराज्य जंगलात वाघांची शिकार करून तस्करी करणाऱ्या कुख्यात शिकारी कृष्णा पट्टीपवार याला खानापूर वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी कणबर्गी येथे अटक केली आहे. त्याच्याकडून चंदन आणि धारधार शस्त्रे जप्त करण्यात आली असून या आरोपीबाबत महाराष्ट्र, मध्यप्रदेश सरकारच्या वनखात्यांशी संपर्क करून पुढील तपास करण्यात येत असल्याची माहिती खानापूर विभागीय वनाधिकारी संतोष चव्हाण यांनी दिली. सदर कारवाई बेळगाव विभागीय वनाधिकारी मंजुनाथ चव्हाण आणि उपवनाधिकारी शंकर कल्लोळीकर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. यावेळी नागराज बाळेहोसूर आणि इतर वन कर्मचारी कारवाईत सहभागी झाले होते. त्याला न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली असून खानापूर वनविभागीय अधिकारी चौकशी करत आहेत.
याबाबत माहिती अशी की, खानापूर तालुक्यातील जंगलातून काही महिन्यांपूर्वी चंदन चोरण्यात आले होते. याचा तपास खानापूर वनाधिकाऱ्यांकडून करण्यात येत होता. अटक केलेला आरोपी कृष्णा पट्टीपवार हा कणबर्गीजवळ असल्याची माहिती मिळताच खानापूर वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी बेळगाव विभागीय अधिकाऱ्यांशी संपर्क साधून कणबर्गीजवळ सापळा रचला आणि कृष्णा पट्टीपवार याला अटक केली. त्याच्याजवळून चंदन आणि काही धारधार शस्त्रे जप्त करण्यात आली आहेत. खानापूर वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी त्याची सखोल चौकशी केली असता त्याने महाराष्ट्रातील मेळघाट जंगलातील वाघांची शिकार केल्याचे कबूल केले आहे. तसेच मध्यप्रदेश आणि कर्नाटकातील जंगलातही त्याने वाघांची शिकार केली आहे. त्यामुळे वनखात्याने चौकशीसाठी महाराष्ट्र वनखाते आणि राष्ट्रीय व्याघ्र संरक्षण प्राधिकरणाचे अधिकारी राजेंद्र गारवाड यांच्याशी संपर्क साधून कृष्णा पट्टीपवार याच्याबाबत माहिती देण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे. कृष्णा पट्टीपवार हा मध्यप्रदेशातील दामो जिल्ह्यातील सागोनी गावातील रहिवासी असून आंतरराष्ट्रीय वन्य प्राण्यांच्या तस्करातील सदस्य असल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे.









