वार्ताहर /हल्याळ
हल्याळ तालुक्यातील खामडोळी, कासरंडा व अल्लोळ्ळी गावाच्या परिसरात वाघाचे ठसे दिसून आल्याने गावकऱ्यांत भीतीचे वातावरण पसरले आहे. गेल्या दोन-तीन दिवसांपासून या भागात वेगवेगळ्या ठिकाणी वाघाच्या पंजाचे 8 ठसे आढळले आहेत. यामुळे गावकऱ्यांनी अरण्य विभाग हल्याळ यांच्याकडे तक्रार केले आहे. कासरंडा, अल्लोळ्ळी व खामडोळी गावातील नागरिकांच्या गेल्या तीन-चार दिवसांपासून तक्रारी आल्याने अरण्य विभागाचे अधिकारी, फॉरेस्टर व गार्ड यांनी भेट देऊन पाहणी केली आहे. त्यांनासुद्धा वाघाच्या पायाच्या ठसे उमटलेले स्पष्ट दिसून आले आहे. याचे फोटो घेऊन वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे सादर करणार असल्याचे अरण्य कर्मचाऱ्यांनी स्पष्ट केले. हल्याळ तालुक्यातील दक्षिण व पश्चिम भागात शेकडो गावे येतात. या भागात अरण्य प्रदेश आहे. याच भागात दरवर्षी भाताचे, मक्याचे उसाचे व इतर द्विदल धान्याचे जंगलीप्राणी यांच्याकडून नासाडी केली जात आहे. यात शेतकऱ्यांचे नुकसान मोठ्या प्रमाणात होत आहे. पण नुकसानभरपाई मात्र कमी मिळत असल्याने शेतकरी नाराज आहेत. भात व इतर पिकांची नासाडी होत आहे. याचबरोबर जंगली हिंस्त्र प्राणी गावात येऊन पाळीव जनावरांवर हल्ला करून ठार मारत असल्याच्या अनेक घटना सतत घडत आहेत. यामध्ये वासरे, कुत्री यांच्यावर बिबट्याकडून सतत हल्ले होत असल्याच्या प्रकारामुळे गावकऱ्यांनी यापूर्वीच अनेकदा तक्रार केली आहे.
पाळीव जनावरे घराबाहेर बांधू नका
अरण्य प्रदेशात येणाऱ्या खेडगावात अरण्य कर्मचारी जाऊन नागरिकांना आपापल्या घरासमोर उघड्यावर गाय, म्हैस, वासरू, बकरी याना बांधून ठेऊ नका. त्यांना सुरक्षित गोठ्यात बांधून व्यवस्थित दरवाजा लाऊन घ्यावे. शिवाय पाळीव प्राण्यांचा आरडाओरड झाल्यास त्वरित दरवाजाची कडी काढून बाहेर येऊ नये, असे आवाहन अरण्य विभागाने गावकऱ्यांना केले आहे. याचबरोबर गावकऱ्यांनी कोणता प्राणी आले होते. याचे व्यवस्थित निरिक्षण करून आम्हाला माहिती द्यावे, अस निवेदन अरण्य कर्मचाऱ्यांनी ग्रामस्थांकडे केले आहे.









