टायर 2 आणि 3 शहरांचा भरती प्रक्रियेमध्ये वाटा 40 टक्क्यांवर पोहोचला आहे. एका अहवालामध्ये या संदर्भातील माहिती देण्यात आली आहे. बिगर मेट्रो शहरांमध्ये विविध उद्योग कंपन्यांनी तरुणांना सामावून घेतल्याचे पहायला मिळाले. या शहरांमध्ये गेल्या महिन्यात नोकरीसाठी अर्ज करणाऱ्यांच्या संख्येमध्ये दुप्पटीने वाढ झालेली दिसून आली. महत्त्वाच्या मोठ्या शहरांव्यतिरिक्त टायर 2 टायर 3 शहरांमध्ये नोकरीच्या संधी अधिक उपलब्ध होत आहेत हेही या निमित्ताने अधोरेखित झाले आहे.
लघु आणि मध्यम आकाराच्या व्यवसायांनी भारतात नोकर भरतीसंख्या वाढविण्यात मोलाचे योगदान दिलेले आहे. याच शहरांनी नोकरीच्या अधिक संधी उपलब्ध केल्या आहेत. मेट्रो शहरातच नाही तर जवळपास 900 शहरांमध्ये या व्यवसायांनी अनेकांना भरती करून घेतलेले आहे. 3 लाख 10 हजार जणांना नोकरीची संधी पहिल्या तिमाहीत तरुणांना प्राप्त झालेली आहे. यामध्ये लघु आणि मध्यम व्यवसायांनी 2 लाख 10 हजार जणांना नोकरीच्या संधी दिल्या आहेत. यामध्ये महिलांची संख्या 28547 इतकी आहे. जीवनविमा क्षेत्रातल्या कंपन्या, ऑनलाईन पेमेंट कंपन्या, मालवाहतूक करणाऱ्या कंपन्या,
ऑनलाईन शॉपिंग पोर्टल कंपन्या यांनी जवळपास एक लाखांपेक्षा अधिक जणांना सामावून घेतले आहे. डिजिटल क्षेत्राची वाटचाल वेगाने होत असून या संबंधीत कंपन्यांनी रोजगार देण्यावर अलीकडच्या काही महिन्यात भर दिला आहे.
टायर 2 शहरांमध्ये तंत्रज्ञानाशी संबंधित कुशल उमेदवारांना संधी मिळताना दिसते आहे. 2025 च्या पहिल्या तिमाहीत सॉफ्टवेअर किंवा वेब डेव्हलपर पदाच्या उमेदवारांचे 65 टक्के प्रमाण वाढलेले दिसले. यामध्ये नव्या उमेदवारांची संख्या 42 टक्क्यांनी वाढलेली होती. एआय/एमआय, सायबर सिक्युरिटी, बिझनेस इंटेलिजन्स अशा डिजिटल क्षेत्रातील विभागात कुशल मनुष्यबळाची गरज लागते आहे. दिल्ली-एनसीआर, बेंगळूर आणि मुंबई ही शहरे टेकसंबंधीत नोकरी देण्यात आघाडीवर राहिली आहेत. याच्यापाठोपाठ इंदोर, जयपूर, लखनौ, राजकोट आणि वारंगळ या शहरांनी टेक संबंधित नोकरी देण्यासाठी पुढाकार घेतला आहे. या शहरांनी वर्षाच्या आधारावर पाहता टेकसंबंधीत रोजगार देण्यामध्ये 30 ते 50 टक्के वाढ नोंदवली आहे. या शहरांमध्ये अर्ज करणाऱ्यांची संख्या झपाट्याने वाढत आहे. सदरच्या शहरांमध्ये अभियांत्रिकी संबंधित कुशल उमेदवार त्याचप्रमाणे डिजिटल पायाभूत क्षेत्राची उपलब्धता याबाबी टेक संबंधित रोजगार वाढीसाठी सहाय्यकारक ठरल्या आहेत.
एप्रिलमध्ये वाढले प्रमाण
मागच्या एप्रिल महिन्यात भरतीचे प्रमाण 9 टक्के इतके वाढीव पहायला मिळाले आहे. एका अहवालामध्ये दिलेल्या माहितीनुसार एप्रिल महिन्यात फार्मा, रियल्टी आणि जागतिक क्षमता केंद्रे यांनी नोकरी देण्यामध्ये आघाडी घेतली आहे. आर्थिक वर्ष 2026 ची एका अर्थाने भरती संदर्भात चांगली सुरुवात झाली आहे, असे म्हणायला हरकत नाही. फार्मा क्षेत्राने 14 टक्के जणांना भरती करून घेतले आहे. या पाठोपाठ रियल इस्टेट क्षेत्रात भरतीचे प्रमाण 11 टक्के आहे. तिसऱ्या नंबरवर असणाऱ्या जागतिक क्षमता केंद्राचे भरतीचे प्रमाण 10 टक्के असून तेल आणि वायू संबंधित क्षेत्रांनी रोजगार देण्यात 9 टक्के प्रमाण राखले आहे. औषध क्षेत्राने म्हणजेच फार्माने भरती प्रक्रियेमध्ये चांगला हातभार लावला आहे. जैव विज्ञान आणि संशोधन विकास या दोन विभागांनी जास्तीत जास्त उमेदवारांना नोकरीत सामावून घेतले आहे. हे प्रमाण बेंगळूर-पुणे आणि चेन्नईत अधिक राहिले आहे. तेल आणि वायू विभागाने एप्रिलमध्ये भरतीत वाढ केली आहे. मार्चमध्ये काहीशी नोकर भरती या क्षेत्रात कमी राहिली होती. विक्री आणि व्यवसाय विकास यासारख्या विभागामध्ये भरती अधिक राहिली होती.
उमेदवारांची भरती करताना अनुभवी उमेदवारांना सर्वाधिक प्राधान्य होते. 8 ते 12 वर्षाचा अनुभव असणाऱ्यांना भरती करण्याचे प्रमाण वाढून 33 टक्क्यांवर पोहोचले होते. नव्याने भरती होणाऱ्या फ्रेशर्सचे प्रमाण 5 टक्के वाढले होते. आयटी आणि सॉफ्टवेअर सेवा क्षेत्राने भरतीमध्ये 3 टक्के वाढ नोंदवली आहे. डाटा सायंटिस्ट, डाटा टेस्टिंग इंजिनियर्स आणि डाटा प्लॅटफॉर्म स्पेशालिस्ट यांच्या भरतीत 26 ते 30 टक्क्यांची वाढ दिसून आली. स्टार्टअप कंपन्यांची कामगिरीसुद्धा चांगली पहायला मिळाली.
बेंगळूर आणि पुणे शहरांनी स्टार्टअप कंपन्यांच्या माध्यमातून भरतीत अनुक्रमे 14, 11 टक्के वाढ केली आहे. बँकिंग, वित्तसेवा आणि विमा क्षेत्राने 8 टक्क्यांहून अधिक जणांना भरतीत सामावून घेतले आहे. एकंदर पाहता नोकर भरतीच्या प्रमाणातील वाढ येणाऱ्या काळात नव्या उमेदवारांना संधींची दारे खुली करणार आहे, हे नक्की.
-दीपक कश्यप








