रात्री उशिरा फोनची रिंग वाजली. हॅलो, नमस्ते मॅडम मी रोहन बोलतोय. मला येत्या दोन दिवसात आपल्याला भेटता येईल का? माझ्या मुलीला सदैव आनंदी राहण्याचा ध्यास लागलाय आणि तो ध्यास समस्या बनायच्या आतच मला आपल्याला भेटायचंय. बरं.. ठीक आहे. परवा संध्याकाळी तुम्ही या, असं म्हणत मी फोन ठेवला.
दिलेल्या वेळेनुसार रोहन आणि त्यांची कन्या समृद्धी भेटायला आले. तिला बाहेरच्या खोलीत बसवूनच ते आत आले. नमस्कार मॅडम. समृद्धी माझी मुलगी जन्माला आली ती खरोखरच समृद्धी घेऊनच.. घरात साऱ्यांचीच लाडकी. तिचा स्वभावही चांगला आहे. मदतीची वृत्ती आहे. दिसायला तर नक्षत्र आहे. पण काहीतरी बदललंय याची जाणीव होतेय मला. गेले चार पाच महिने तिला प्रसन्न, आनंदी राहण्याचा ध्यास लागलाय. आठ दिवसापूर्वी कॉलेजमध्ये काहीतरी बिनसलं. हिला खूप वाईट वाटलं. मूड गेला. दोन तासाने सारं ठीक झालं, पण माझा मूड असा जाऊच कसा शकतो म्हणून ही खट्टू झाली. खूप समजावलं तिला पण सारखं एकच, ‘हे असं होऊन उपयोग नाही. नेहमी आनंदीच असलं पाहिजे.’ हल्ली सकाळी रोज ती आरशात पहात मंत्र म्हटल्यासारखं हे वाक्मय म्हणतेच.
मला हे थोडं वेगळं वाटलं.. जीवनात किती चढउतार असतात. त्याचा स्वीकार न करता नुसता हाच दृष्टिकोन घेऊन तिची वाटचाल झाली तर सारं अवघड होईल..
हो.. खरं आहे. समृद्धीचं वय किती? एकोणीस. बरं.. ती मोबाईलमध्ये कितपत रमते? मोबाईल हल्लीच घेतला तिला. वाचन करते बरंच त्यावर. इथे यायला आधी नाहीच म्हणत होती. पण तिला सांगितलं, तुला कायमच आनंदी रहायचंय ना, मग ते कसं रहायचं हे सांगू शकतील अशा व्यक्तीला आपण भेटूया. हे सांगितल्यावर ती यायला तयार झाली. प्लीज मॅडम काहीतरी करा. मला टेन्शन आलंय हो… हं..तिला आत पाठवाल का? रोहनने समृद्धीला आत पाठवलं.
येऊ का मॅडम? ये. बस ना. समृद्धी, बाबांनी मला सांगितलं की, तुला कायमच आनंदी रहायला आवडतं. हो मॅडम!! माणसानं कायम आनंदी असायला हवंच ना? हो.. खरं.. पण मला सांग, खरंच असं कायम शक्मय आहे? तुला काय वाटतं?
मॅडम, मी प्रयत्न करतेय तसा.. पण तसं जमत नाहीये. परवा माझी एक असाईनमेंट कम्पलिट झाली नव्हती. खरंतर मी नेहमी पूर्ण करते सारं, पण त्या दिवशी अपूर्ण राहिलं. मॅडम ओरडल्या. मला खूप अपमानास्पद वाटलं. मूड गेला माझा. मी तासाभरानी स्वत:ला सावरलं, पण मूड गेला याचाच मला राग आला.
बरं. पण कधीतरी असं होणं हे नैसर्गिक आहे. हो, बाबाही तसंच सांगतात मला. परंतु माझ्या दिसण्यावर परिणाम होणार ना त्या मूडचा (आता मला हवा तो धागा हळूहळू सापडत होता) असं कुणी सांगितलं तुला? सहा महिन्यापूर्वी मोबाईलवर एक लेख वाचला त्यामध्ये असा उल्लेख होता की, ‘आनंदी असणं हेच सौंदर्य टिकवण्याचं, चिरतऊण राहण्याचं औषध आहे.’ त्यानंतर याच्याशी संबंधित अशा बऱ्याच गोष्टी वाचल्या मी. बरं.. मग ते वाचल्यावर तुला काय वाटलं?.. मला वाटलं की माझं सौंदर्य टिकवण्याची हीच गुऊकिल्ली आहे. ठीक आहे. पण मला सांग, शारीरिक सौंदर्य हे तरी कायम टिकतं का? नाही ना मॅम, मग एवढा आटापिटा कशासाठी? मला भीती वाटते मॅम! कसली? आजवर कुणालाच बोलले नाही.. एक सांगू का? हं बोल ना..माझी एक मैत्रिण आणि मी अगदी पाचवी ते अकरावी एकत्र होतो.. बेस्ट फ्रेंडच होतो आम्ही. तिला एक मुलगा आवडायचा. सगळे चिडवायचेही तिला. पण त्याला ती आवडत नव्हती. नंतर तिला कळलं की, त्याला मी आवडते. यात माझा काय दोष? ती एकदम बदललीच तेव्हापासून. मी खूप समजावण्याचा प्रयत्न केला तिला, परंतु तिनेच मैत्री तोडली.. मला खूप बोलली. तुझं सौंदर्य आवडतं लोकांना. सगळ्यांची मर्जी तुझ्यावरच.. तुझं रूप थोडंच कायम राहणार आहे? एक ना एक दिवस हे बदलणारच, मग बघ, तुला कोण विचारतंय. त्या दिवसानंतर मला मी कुरूप झालेय, कुणी तोंडावर अॅसिड फेकतंय अशी स्वप्नं पडायला लागली. खरंच आपण कुरूप झालो तर.. हा विचार गेलं वर्षभर मनात राहून राहून येत होता. सहा महिन्यापूर्वी बाबांनी हा मोबाईल घेऊन दिला. मग मी त्यावर सौंदर्याच्या टिप्स शोधायचे. शोधता शोधता काही लेख मिळाले. त्यात उल्लेख होता की मन आनंदी असेल तर सौंदर्य बहरतं, मग वाटू लागलं की आपण दु:खी होताच कामा नये. वगैरे वगैरे.. बराच वेळ तिच्यासोबत चर्चा झाली. समृद्धीचं टीन एज.. त्यात त्या खास मैत्रिणीकडून अशा तऱ्हेने दुखावलं जाणं, सौंदर्य गेलं तर काय होईल ही भीती, सोशल मीडियावरून होणाऱ्या अनेक टिप्सचा मारा या सगळ्याची एकत्रित परिणती म्हणजे सतत आनंदी राहण्याचा ध्यास, अट्टहासच सुरू झाला होता. समृद्धीला माणसाचं भावविश्व, सुख, दु:ख, त्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन, मानवी मनाची भरती ओहोटी हे सारं समजावत हळूहळू तिची मूल्ये, ‘मी’च्या गाठोड्यातील सध्याच्या आवश्यकतेनुसार गरजेचा ‘विद्यार्थी मी’ त्याचा विकास या साऱ्याकडे लक्ष वळवत.. सजगतेसंदर्भात काही तंत्रे शिकवावी लागली. काही भेटीनंतर समृद्धीच्या दृष्टिकोनात बदल करण्यात यश मिळाले.
आनंदी राहायची इच्छा असण्यात वावगं काही नाही परंतु हवामानात, तापमानात जसा बदल होतो, तशाच पद्धतीने अगदी नैसर्गिकरित्या आपली मन:स्थितीसुद्धा बदलत असते हे समजून घ्यायला हवे. आपण कोणीच सदा सर्वकाळ आनंदी असू शकत नाही. आपला मूड जेव्हा कधी छान असतो तेव्हा आपलं कुटुंब, आपलं गाव, अगदी लहानशी गोष्टही छान वाटते. अशावेळी जास्तीचं काम पडलं, पाणी लवकर गेलं, कप फुटला अशा किरकोळ गोष्टीही ‘जाऊ दे ना, त्यात काय एवढं!’ असं म्हणून आपण सोडून देतो. जेव्हा कधी मूड खराब असतो तेव्हा छॅ पाणी लवकरच गेलं.., गॅसच संपला, एवढंच काय, साधी खुर्ची सरकवतानाही खर्रर्र असा आवाज झाला तरी आपण चिडतो. आपण सगळेच कमी अधिक फरकांनी असेच असतो. कधीतरी मनाची भरती ओहोटी सुरू असते, ती समजून घ्यायला हवी. तुमचं मनानी शांत असणं, आनंदी असणं तुम्हाला प्रगतीकडे नेतं. त्या प्रसन्न असण्याचं तेज चेहऱ्यावर दिसतं हेही खरं, परंतु आपण माणसं आहोत म्हटल्यावर सुख दु:ख या गोष्टी जीवनाचं अविभाज्य अंग आहे. रस्त्यामध्ये जसे खाचखळगे, गतिरोधक असतात तसेच जीवनातही काही अडचणी, समस्या येतातच. त्यांचा स्वीकार करून संयमाने त्यातून मार्ग काढत वाटचाल करणे गरजेचे असते.
सौंदर्याच्याबाबतीतही तसंच आहे. बाह्यारूपाचा अनुकूल वा प्रतिकूल परिणाम होत असतो हे जरी खरं असलं तरी कसे दिसतो यापेक्षाही आपण कसे आहोत, कसे वागतो, आपलं कर्तृत्व कसं आहे हे जास्त महत्त्वाचं. प्रथमदर्शनी जाणवणारं सौंदर्य संपूर्ण व्यक्तिमत्त्वाचा केवळ एक घटक आहे. याबाबत अब्राहम लिंकन यांचे एक वाक्मय स्मरणात ठेवण्याजोगे आहे लिंकन म्हणतात, ‘आपण जन्माला येताना जो चेहरा घेऊन येतो तो देवाने दिलेला. पण नंतर आपला चेहरा बनतो तो असतो आपण घडवलेला.’
माणसाचं ‘मन’ हा एक वेगळाच विषय आहे. विविध इच्छा, आकांक्षा, अपेक्षा, भविष्याची स्वप्ने अशा वेगवेगळ्या भावभावना त्यात दडलेल्या असतात. मनाला हाताळणे, ते जाणणे हे तसं कौशल्याचं काम.. परंतु सजग रहात ते जाणता आलं तर ‘आनंदाच्या शोधात’ भरकटणं होणार नाही हे मात्र खरं!
-अॅड. सुमेधा संजीव देसाई









