वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
चीनमधील हेंगझोयु येथे 23 सप्टेंबर ते 8 ऑक्टोबर दरम्यान होणाऱ्या आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी भारताचे मुष्टीयोद्धे दीपक भोरिया, निशांत देव, तसेच परवीन हुडा यांनी आपली पात्रता सिद्ध करत या स्पर्धेचे तिकीट आरक्षित केले. मात्र अमित पांगल आणि नितू यांना पात्रता सिद्ध करता आली नाही.
शनिवारी भारतीय मुष्टीयुद्ध संघटनेने या आगामी स्पर्धेसाठी मुष्टीयुद्ध संघाची घोषणा केली. या संघामध्ये विश्व मुष्टीयुद्ध चॅम्पियनशिप स्पर्धेत कास्यपदक विजेते दीपक भोरिया (51 किलो) व निशांत देव (71 किलो) यांचा समावेश करण्यात आला आहे. त्याचप्रमाणे महिलांच्या विभागात 57 किलो गटात परवीन हुडाची निवड करण्यात आली आहे. 2022 साली झालेल्या विश्व मुष्टीयुद्ध स्पर्धेत परवीन हुडाने कास्यपदक मिळवले होते. निवडण्यात आलेल्या भारतीय संघामध्ये महिलांच्या विभागात राष्ट्रकुल स्पर्धेतील कास्यपदक विजेती जस्मीन लंबोरिया (60 किलो), अरुंधती चौधरी, प्रिती पवार, निखत झरीन (51 किलो), लवलिना बोर्गोहेन (75 किलो) यांचा सहभाग करण्यात आला आहे. दोनवेळा विश्व चॅम्पियनशिप जिंकणारी निखत झरीन आणि टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेतील कास्यपदक विजेती लवलिना यांना आशियाई स्पर्धेसाठी थेट प्रवेश मिळाला आहे. कारण या दोघींना गेल्या मार्चमध्ये झालेल्या विश्व मुष्टीयुद्ध चॅम्पियनशिप स्पर्धेत अंतिम फेरी गाठली होती. आशियाई स्पर्धेतील मुष्टीयोद्ध्यांच्या कामगिरीवर विशेष लक्ष दिले जाणार आहे. कारण 2024 साली होणाऱ्या पॅरीस ऑलिम्पिकसाठी वरील स्पर्धा ही पहिली पात्र फेरीची आशिया खंडासाठी राहणार आहे.
2019 साली विश्व मुष्टीयुद्ध चॅम्पियनशिप स्पर्धेत रौप्यपदक मिळवणारा तसेच आशियाई क्रीडा स्पर्धेतील लाईट फ्लायवेट गटातील विद्यमान विजेता अमित पांगलला आपले विजेतेपद राखता आले नाही. त्याला 51 किलो गटात दीपक भोरियाने मागे टाकल्याने अमित पांगलला आशियाई स्पर्धेचे तिकीट हुकले आहे. त्याचप्रमाणे महिलांच्या 48 किलो वजन गटातील विश्व विजेती नितू घनघासला 54 किलो वजन गटात प्रिती पवारने मागे टाकल्याने नितूला आशियाई स्पर्धेची संधी हुकली आहे. त्याचप्रमाणे 92 किलो गटात संजीत, 80 किलो गटात लक्ष्य चहर आणि नरेंद्र बेरवाल यांनी मात्र आशियाई स्पर्धेचे तिकीट आरक्षित केले आहे.
भारतीय मुष्टीयुद्ध संघ- पुरुष – दीपक भोरिया (51 किलो), सचिन सिवाच (57 किलो), शिवा थापा (63.5 किलो), निशांत देव (71 किलो), लक्ष्य चहर (80 किलो), संजीत (92 किलो), नरेंद्र बेरवाल ( 92 किलो वरील)
महिला- निखत झरीन (51 किलो), प्रिती पवार (54 किलो), परवीन हुडा (57 किलो), जस्मीन लंबोरिया (60 किलो), अरुंधती चौधरी (66 किलो), लवलिना बोर्गोहेन (75 किलो









