वृत्तसंस्था /जकार्ता
भारताची नेमबाज रिदम सांगवानने येत्या जुलै-ऑगस्ट दरम्यान होणाऱ्या पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेचे तिकीट निश्चित केले आहे. येथे सुरू असलेल्या 2024 च्या पॅरिस ऑलिम्पिक आशियाई पात्र फेरीच्या नेमबाजी स्पर्धेत तिने महिलांच्या 25 मी. पिस्तुल नेमबाजी प्रकारात कांस्यपदक पटकाविले. पॅरिस ऑलिम्पिकसाठी पात्र ठरणारी रिदम सांगवान ही भारताची 16 वी नेमबाज आहे. 2020 साली झालेल्या टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेत भारताच्या 15 नेमबाजांचा समावेश होता. मात्र 2024 च्या पॅरिस ऑलिम्पिकसाठी नेमबाजांच्या संख्येत वाढ झाली आहे. जकार्तामधील पात्र फेरीच्या नेमबाजी स्पर्धेत भारताच्या ईशा सिंग, वरुण तोमर (10 मी. एअर पिस्तुल नेमबाजीत) आणि 25 मी. महिलांची एअर पिस्तुल नेमबाजी प्रकारात रिदम सांगवान या तीन भारतीय खेळाडूंनी पॅरीस
ऑलिम्पिकच तिकीट निश्चित केले. गेल्या वर्षी झालेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेत हरियाणाच्या 20 वर्षीय रिदम सांगवानने 25 मी. स्पोर्ट्स पिस्तुल नेमबाजी प्रकारात सांघिक विभागात सुवर्णपदक मिळविले होते. ईशा, मनू भाकर आणि रिदम सांगवान यांचा या सांघिक क्रीडा प्रकारात समावेश होता. जकार्ता स्पर्धेमध्ये महिलांच्या 25 मी. स्पोर्ट्स पिस्तुल नेमबाजी प्रकारात रिदमने 28 शॉट्स नोंदवित कांस्यपदक पटकाविले. या क्रीडा प्रकारात कोरियाच्या जिनने 41 शॉट्ससह सुवर्ण तर कोरियाच्या किम येझीने 32 शॉट्ससह रौप्यपदक पटकाविले. जकार्ताच्या स्पर्धेतील रिदमचे हे तिसरे पदक आहे. गेल्या सोमवारी तिने महिलांच्या 10 मी. एअर पिस्तुल नेमबाजीत कांस्यपदक मिळविले होते. तर भारताच्या ईशाने सुवर्णपदक पटकाविले होते. गेल्या मंगळवारी रिदमने अर्जुनसिंग चिमा समवेत 10 मी. एअर पिस्तुल मिश्र सांघिक प्रकारात रौप्यपदक मिळविले.









