पुणे / प्रतिनिधी
तामिळनाडू आणि लगतचा भाग तसेच दक्षिण पूर्व अरबी समुद्रांत लक्षद्वीप जवळ असलेली हवेची द्रोणीय स्थिती यामुळे राज्यात पुढील दोन दिवस वादळी पावसाचा येलो अलर्ट देण्यात आला आहे.कोकण गोवा तसेच मराठवाड्यात पावसाचा जोर राहणार आहे.
राज्यात अनेक ठिकाणी वादळी पावसास सुरुवात झाली आहे.दक्षिणपूर्व अरबी समुद्रात लक्षद्वीप जवळ हवेची द्रोणीय स्थिती असून, 19 ऑक्टोबरपर्यंत याचे कमी दाबाच्या क्षेत्रात रूपांतर होणार असल्याचे हवामान विभागाने सांगितले आहे.कर्नाटक केरळ किनारपट्टीला समांतर असे हे क्षेत्र निर्माण होणार आहे.याच्या प्रभावामुळे कोकण गोवा किनारपट्टीवरील अनेक जिह्यात गुरुवारी आणि शुक्रवारी विजांचा कडकडाट तसेच सोसाट्याच्या व्रायासह पावसाचा अंदाज वर्तविण्यात आला आहे.
मराठवाड्यात गुरुवारी वादळी पावसाची शक्यता आहे.
बुधवारीं सायंकाळी राज्याच्या अनेक भागात पाऊस झाला. अरबी समुद्रातील स्थितीमुळे केरळ तसेच तामिळनाडू मध्ये पुढील दोन दिवस ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे.
मान्सूनचा निरोप
येत्या 24 तासात मान्सून संपूर्ण देशाचा निरोप घेणार आहे.त्यापाठोपाठ ईशान्य मोसमी वारे दक्षिणेकडे प्रवेश करतील, असा अंदाज वर्तविण्यात आला आहे.









