पुणे / प्रतिनिधी :
पुढील चार दिवस राज्याच्या विविध भागांत विजांच्या कडकडाटासह जोरदार पावसाचा अंदाज पुणे वेधशाळेने वर्तविला आहे. यात कोकणात सोमवारी तुरळक ठिकाणी मुसळधार, तर मराठवाडा व मध्य महाराष्ट्रात 26 तारखेनंतर तुरळक भागात मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
झारखंड व लगतच्या भागावर असलेल्या कमी दाबाची तीव्रता कमी होऊन त्याचे द्रोणीय स्थितीत रुपांतर झाले आहे. याशिवाय अरबी समुद्रातून मोठय़ा प्रमाणात बाष्प येत असल्यामुळे राज्यात गेले तीन ते चार दिवस जोरदार पाऊस होत आहे. कोकणात सोमवारी तुरळक ठिकाणी मुसळधार, तर काही ठिकाणी जोरदार पाऊस होईल. मध्य महाराष्ट्रात सोमवारी बहुतांश ठिकाणी, मराठवाडा व विदर्भात तुरळक ठिकाणी पावसाचा अंदाज आहे. 26 तारखेनंतर पावसाचे प्रमाण पुन्हा वाढणार असून, कोकण गोवा, मध्य महाराष्ट्र तसेच मराठवाडय़ात त्याचा प्रभाव जास्त राहणार असल्याचे हवामान विभागाने म्हटले आहे.








