बेळगाव : सराफ कॉलनी टिळकवाडी येथील महानगरपालिकेच्या गार्डनमध्ये साफसफाई करणारी महिला गेले कित्येक दिवस असहाय्य अवस्थेत रहात होती. गेल्या चार दिवसांपासून तिची तब्येत बिघडल्याने ती खोलीच्या बाहेरही येऊ शकली नाही. आसपासच्या रहिवाशांनी तिला बाहेर येण्यास सांगितले पण तिला चालता पण येत नव्हते.
सराफ कॉलनी रहिवासी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी वृद्धांना आधार या संकल्पनेतून काम करणाऱ्या संजीवीनी फौंडेशनशी संपर्क साधला, लागलीच फौंडेशनच्या संस्थापिका डॉ सविता देगीनाळ, सल्लागार सदस्या डॉ सुरेखा पोटे यांनी त्या असाहाय्य महिलेला भेटून तिला खोलीतून बाहेर काढले व तिची तपासणी केली.
संजीवीनी फौंडेशनच्या कर्मचाऱ्यांनी तिची स्वच्छता करून तिचे कपडे बदलले आणि १०८ रुग्णवाहिकेतून जिल्हारुग्णालयात दाखल केले.
यावेळी मदन बामणे,रहिवासी संघटनेचे अध्यक्ष शिवाजी कामलेकर सचीव अमरेंद्र पद्मा औशेकर,रणजित पाटील,प्रीती नागण्णावर सुनिता शिरगुरे यांनी सहाय्य केले.









