पिस्तुलचा धाक दाखवून सराफी दुकानावर दरोड्याचा प्रयत्न : मालकाच्या प्रतिकारामुळे चोरटे असफल
बेळगाव : सराफी व्यावसायिकावर हल्ला करून दागिने लुटण्याचा प्रयत्न झाला. भरदिवसा शाहूनगर परिसरात घडलेल्या या घटनेने एकच खळबळ माजली असून गुन्हेगार व सराफी व्यावसायिक यांच्यातील झटापटीनंतर व्यावसायिकाने आरडाओरड केल्याने गुन्हेगारांनी तेथून पळ काढला आहे. सोमवार दि. 16 ऑक्टोबर रोजी सकाळी 10 वाजता शाहूनगर येथील संतोषी ज्वेलर्समध्ये ही घटना घडली आहे. हल्ल्यात प्रशांत भगवान होनराव (वय 34) रा. समर्थनगर हे जखमी झाले असून त्यांच्या डोक्याला दुखापत झाली आहे. एपीएमसी पोलीस स्थानकात एफआयआर दाखल झाला आहे. पोलीस पुढील तपास करीत आहेत.
घटनेची माहिती समजताच पोलीस आयुक्त एस. एन. सिद्धरामप्पा, पोलीस उपायुक्त रोहन जगदीश, गुन्हे तपास व वाहतूक विभागाच्या पोलीस उपायुक्त पी. व्ही. स्नेहा, मार्केटचे एसीपी एन. व्ही. बरमणी, खडेबाजारचे एसीपी अरुणकुमार कोळूर, एपीएमसीचे पोलीस निरीक्षक विश्वनाथ कब्बुरी आदी अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. उपलब्ध माहितीनुसार प्रशांत होनराव यांचे शाहूनगर पहिल्या बसस्टॉपजवळ संतोषी ज्वेलर्स हे सराफी दुकान आहे. नेहमीप्रमाणे सोमवारी सकाळी 10 वाजता प्रशांत यांनी आपले दुकान उघडले. दुकानात साफसफाई सुरू असताना दोघे जण दुकानात शिरले. पिस्तुलीचा धाक दाखवत त्यांनी दागिने कुठे ठेवलेत? अशी विचारणा केली. एका गुन्हेगाराने आतून शटर ओढण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी प्रशांत यांनी प्रतिकार केला. सराफी व्यावसायिक व गुन्हेगार यांच्यात झटापट झाली. पिस्तुलीने प्रशांत यांच्या डोक्यावर हल्ला करण्यात आला. या हल्ल्यात ते जखमी झाले. प्रसंगावधान राखून त्यांनी एकच आरडाओरड सुरू केली. मुख्य रस्त्याला लागूनच हे दुकान आहे. त्यामुळे आता लोक जमणार, या भीतीने गुन्हेगारांनी तेथून पळ काढला. घटनेची माहिती समजताच बघ्यांची गर्दी जमली होती.
मॅक्झिन-काडतूस हस्तगत
गुन्हेगारांनी सराफी व्यावसायिकावर हल्ला करताना पिस्तुलीतून मॅक्झिन खाली पडले. त्याच्यातून एक जिवंत काडतूसही दुकानात पडले होते. पोलिसांनी मॅक्झिन व काडतूस ताब्यात घेतले आहे. संपूर्ण प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला असून पोलिसांनी फुटेज ताब्यात घेऊन तपास हाती घेतला आहे. दोन्ही गुन्हेगार पल्सर मोटारसायकलवरून आले होते, हे फुटेजवरून उघड झाले आहे. एकट्याने आपल्या डोक्यावर घातले होते तर दुसऱ्याने मंकी कॅप परिधान केली होती.
कोल्हापुरातील दरोड्याशी साधर्म्य
चार महिन्यांपूर्वी 8 जून 2023 रोजी कोल्हापूर जिल्ह्यातील बालिंगे येथील कात्यायणी ज्वेलर्सवर दरोडा पडला होता. मोटारसायकलवरून आलेल्या सहा ते सात दरोडेखोरांनी भरदुपारी गोळीबार करत सुमारे 1 कोटी 82 हजार रुपये किमतीचे दागिने व रोकड पळविली होती. या हल्ल्यात रमेश माळी (वय 40) व जितू माळी (वय 26) हे दोघे जखमी झाले होते. कोल्हापूर पोलिसांनी या प्रकरणी चौघा आंतरराज्य गुन्हेगारांना अटक केली आहे. या टोळीतील आणखी तिघे जण फरारी आहेत. शाहूनगर येथील घटनेतही आंतरराज्य गुन्हेगारांचा सहभाग असल्याचा संशय आहे. त्यामुळे बेळगाव पोलिसांचे एक पथक माहिती मिळविण्यासाठी कोल्हापूरला रवाना झाले आहे.









