वृत्तसंस्था/ मुंबई
प्रो-कबड्डी लिग हंगामातील येथे झालेल्या अतितटीच्या सामन्यात पुणेरी पलटनने तामिळ थलैवाजचा 29-26 अशा तीन गुणांच्या फरकाने पराभव केला. हा सामना शेवटच्या क्षणापर्यंत रंगतदार झाला. पुणेरी पलटन संघातील गौरव खत्री आणि इराणचा मोहम्मदरेजा शादलोई यांची दर्जेदार कामगिरी झाली.
या सामन्यात तामिळ थलैवाजचा कर्णधार सागरने सर्वोत्तम कामगिरी करताना 7 टॅकल गुण मिळविले. सामन्यातील पहिल्या 20 मिनिटांच्या कालावधीत दोन्ही संघांनी दर्जेदार चढायांवर गुण वसूल करण्यासाठी दर्जेदार खेळ केला. तामिळ थलैवास संघातील नरेंद्रने पहिल्या 5 मिनिटांतच आपल्या सुपर चढाईवर पुणेरी पलटनचे गडी बाद केले. सामन्याच्या मध्यांतरापर्यंत पुणेरी पलटनने तामिळ थलैवाजवर 12-11 अशी नाममात्र आघाडी घेतली होती. सामन्याच्या उत्तरार्धाला प्रारंभ झाल्यानंतर तामिळ थलैवासच्या सागर आणि हिमांषू यांनी पुणेरी पलटनच्या मोहित गोयातला बाद केले. अस्लम इनामदारने 24 व्या मिनिटाला तामिळ थलैवाजचे सर्व गडी बाद करुन पुणेरी पलटनला 17-16 अशी एक गुणाची आघाडी मिळवून दिली होती. 36 व्या मिनिटाला तामिळ थलैवाजच्या अभिषेक आणि सागर यांनी आपल्या चढायांवर गुण वसूल केल्याने या वेळी थलैवासचा संघ 3 गुणांनी पिछाडीवर होता. सामन्याला 1 मिनिट बाकी असताना पुणेरी पलटनने तामिळ थलैवाजवर 29-26 अशी आघाडी मिळवित हा सामना 3 गुणांच्या फरकाने जिंकला. या स्पर्धेतील पुणेरी पलटनचा हा सातवा विजय आहे.









