तीन दिवसात दुसरी घटना, चारचाकी जळून खाक
मिरज / प्रतिनिधी
शहरातील मंगळवार पेठ परिसरात चालत्या चारचाकी वाहनाला अचानक आग लागल्याने एकच खळबळ उडाली. मुसळधार पावसात कारने अचानक पेट घेऊन बघता बघता राख झाली होती. सुदैवाने यात कोणतीही जीवित हानी झाली नाही. मात्र कार जळून खाक झाल्याने मोठे नुकसान झाले आहे. अग्निशमन दलाच्या जवानांनी तातडीने घटनास्थळी दाखल होत आग विझविली. चारचाकीच्या बॅटरीमध्ये शॉर्टसर्किट होऊन आग लागल्याचे सांगण्यात आले. दरम्यान कारला आग लागण्याची तीन दिवसात ही दुसरी घटना आहे. दोन दिवसांपूर्वी बोलवाड रोड येथे अशाच पद्धतीने इनोवा कारलाही आग लागल्याची घटना घडली होती.
घटनास्थळावरून मिळालेल्या अधिक माहितीनुसार, मंगळवारी सकाळी आठ वाजता सुनिल विष्णुपंत कुलकर्णी हे चारचाकी (एमएच – १० – सीए – २९२७) मधून मंगळवार पेठ येथून मार्केटकडे चालले होते. यावेळी प्रचंड प्रमाणात मुसळधार पाऊस सुरू होता. कुलकर्णी हे चारचाकीतून चर्च रोड जवळ आले असता, वाहनाच्या बोनेट मधून अचानक धूर येऊ लागला. यावेळी प्रसंगावधान राखत चालक सुनील कुलकर्णी यांनी गाडी रस्त्याकडे लावली. व स्वतः गाडीच्या बाहेर आले. भर पावसातच काही क्षणाच्या आत गाडीने अचानक पेट घेतला. बघता बघता संपूर्ण चारचाकी जळून खाक झाली. मुसळधार पावसात बर्निंग कारचा थरार पाहण्यासाठी बघायची मोठी गर्दी झाली होती. याबाबत अग्निशमन विभागाला माहिती देण्यात आली. अग्निशमन दलाच्या जवानांनी तातडीने घटनास्थळी जाऊन आग विझवण्याचा प्रयत्न केला. भर पावसात भर रस्त्यात बर्निंग कारचा थरार झाल्याने परिसरात खळबळ उडाली होती.
दरम्यान कारला आग लागल्याची तीन दिवसात दुसरी घटना घडली आहे. दोनच दिवसांपूर्वी शहरातील बोलवाड रोड येथे अशाच पद्धतीने इनोवा चारचाकीला ही आग लागली होती. यामध्येही इनोवा कार जळून खाक झालेले मोठे नुकसान झाले होते. चारचाकी वाहनांच्या बॅटरीमध्ये शॉर्टसर्किट होऊन आग लागत असल्याचे अग्निशमन विभागाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.








