वास्कोतील अपघातात दुचाकी सापडली बसच्या चाकाखाली पोलिसांना चकवण्यासाठी तिघे युवक जात होते ‘टिबल सीट’

वास्को : वास्को शहरात काल रविवारी सायंकाळी झालेल्या भीषण अपघातात दोघेजण जागीच ठार झाले तर एकटा गंभीर जखमी झाला आहे. एकाच दुचाकीवरून भरधाव वेगाने निघालेले तिघे युवक कदंब बसच्या मागच्या चाकाखाली सापडले. भर शहरात हा अपघात घडल्याने बराच वेळ भयाण वातावरण निर्माण झाले होते. मयत युवकांची नावे प्रकाश बिंद (30), अरूणकुमार सरोज (19) अशी आहेत. जखमीचे नाव रितीशकुमार सरोज (29) असे असून त्याला गोमेकॉमध्ये दाखल करण्यात आलेले आहे. मयत व जखमी मूळ उत्तर प्रदेशमधील आहेत. त्यांचे वस्ताव्य झुआरीनगर बिर्ला भागात होते. वेर्णा येथे टेम्पो व कार यांच्यात समोरासमोर झालेल्या अपघातात कारचालक युवक जाणीच ठार झाला. वास्को शहरातील वास्को टॉवर्स इमारतीसमोरील बॉम्बे गार्मेमेन्टस्च्या नाक्यावर हा भीषण अपघात संध्याकाळी साडेसहाच्या सुमारास घडला. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार मडगावहून वास्को शहरात आलेल्या कदंब बसच्या मागच्या चाकाखाली हे तिघे दुचाकीस्वार युवक सापडले. सदर बस वास्कोहून पुन्हा मडगावकडे निघणार होती. शहरातील आरटीओ कार्यालयासमोरील रोजच्या आतील मार्गाने वळसा घेऊन ही बस जुन्या बसस्थानकाकडे जात असताना हा अपघात झाला.
‘टिबल सीट’ होते दुचाकीस्वार
‘टिबल सीट’ बसलेले हे तिघेही युवक हॉटेल उर्वशीसमोरील रस्त्यावरून बॉम्बे गार्मेटपर्यंत आले होते. याच नाक्यावर समोरुन बस आल्याने थांबण्याच्या प्रयत्नात असताना तिघेही दुचाकीसह बसच्या मागच्या चाकाखाली सापडले. दोघांना जागीच मृत्यू आला. तर एकटा गंभीर जखमी आहे. प्रकाश बिंद हा स्कुटर चालवत होता. भर शहरात घडलेल्या या अपघातामुळे काही वेळ गोंधळ व भय निर्माण झाला. पोलिसांनी घटनास्थळी दाखल होऊन मृतदेह व जखमीला उचलून हॉस्पिटलमध्ये पाठवून दिले. वास्को पोलीस या अपघाताचा अधिक तपास करीत आहेत.
पोलिसांना चकवण्याच्या प्रयत्नात अपघात
या भीषण अपघाताची धक्कादायक माहिती कदंब बसचे चालक तसेच काही बघ्यांनी पत्रकारांना दिली. त्यांच्या म्हणण्यानुसार स्कुटरवर स्वार झालेले तिघे युवक भरधाव वेगाने आले होते. ते सरळ जाऊन बसच्या मागच्या बाजुला धडकले. त्यांच्यामागे पोलिसांचे वाहन होते. वाहतूक नियम धुडकावून एकाच दुचाकीवर तिघे जण फिरत असल्याने पोलीस त्यांच्या मागे होते. त्यामुळे पोलिसांना चकवण्यासाठी ते वाट काढीत पळत होते, अशी माहिती प्रत्यक्षदर्शी लोकांनी दिली. यामुळे या अपघाताची पार्श्वभूमी किती धक्कादाय आहे याची प्रचिती येते.
सर्रास धुडकावले जातात पोलिसांचे इशारे
वास्को शहर व परिसरात वाहतूक नियम डावलून अशा प्रकारे सुसाट दुचाक्या हाकण्याचे प्रकार सर्रास दिसून येत आहेत. काही विशिष्ठ वर्गातील युवक वाहतूक व्यवस्थेसमोर गंभीर समस्या निर्माण करीत आहेत. हे युवक पोलिसांचे इशारे धुडकावून सुसाट पळतात. त्यामुळे अपघातांच्या भितीने गस्तीवरील वाहतूक पोलिसही त्यांच्यामागे लागणे टाळत असतात. ही समस्या वास्कोत गंभीर रूप धारण करीत आहे.
वेर्ण्यात कार चालक ठार
वेर्णा बायपास मार्गावर मालवाहू टेम्पो आणि कार यांच्यामध्ये झालेल्या अपघातात कारचालक युवक ठार झाला. ही घटना रविवारी सकाळी साडेसहाच्या सुमारास घडली. मयत युवकाचे मॅक आर्थर परेरा (23) असे असून तो उतोर्डा भागातील राहणारा आहे. या अपघातात दोन्ही वाहनांची समोरासमोर धडक झाली. वेर्णा पोलिसांकडून मिळालेल्या अधिक माहितीनुसार, वेर्णा बायपास महामार्गावरून अपघातग्रस्त टेम्पो वेर्णाच्या दिशेने जात होता. अपघातग्रस्त कार मडगावच्या दिशने जात होती. या दोन्ही वाहनांची समोरासमोर जोरदार धडक झाली. दोन्ही वाहनांच्या दर्शनी भागाचा चक्कचूर झाला. यात कारचालक जागीच ठार झाला, तर टेम्पोचालक किरकोळ जखमी झाला आहे. अपघाताची माहिती मिळताच वेर्णा पोलिसांनी घटनास्थळी दाखल होऊन मृतदेह उचलून हॉस्पिसियो इस्तितळात पाठविला. तेथे कारचालकाला मृत घोषित करण्यात आले. मयत युवक उतोर्डा भागातील राहणारा आहे. वेर्णा पोलिसांनी अपघाताचा पंचनामा केलेला असून पोलीस अधिक तपास करीत आहेत.









