वडवळ येथील धक्कादायक घटनेने मोहोळ तालुक्यात खळबळ
पाटकुल / सुहास परदेशी :
मातृत्वाच्या नात्याला काळीमा फासणारी संतापजनक घटना मोहोळ तालुक्यातील वडवळ पाटी (स्टॉप) येथे उघडकीस आली आहे. केवळ जेवण न करणे आणि शाळेत न जाणे यासारख्या किरकोळ कारणांवरून सुरू असलेला छळ अखेर एका तीन वर्षीय निष्पाप चिमुकलीच्या हत्येपर्यंत पोहोचला. सावत्र आईनेच तिचा गळा दाबून खून केल्याची ही मन सुन्न करणारी घटना आहे. या घटनेने संपूर्ण तालुका हादरला असून आरोपी सावत्र आईला पोलिसांनी अटक केली आहे.
हत्या झालेल्या मुलीचे नाव कीर्ती नागेश कोकणे (वय ३) असे असून, या प्रकरणी पोलिसांनी तिची सावत्र आई तेजस्विनी नागेश कोकणे (वय ३३) हिला अटक केली आहे.
मोहोळ पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, नागेश कोकणे हे आपल्या दुसऱ्या पत्नी तेजस्विनी व पहिल्या पत्नीच्या दोन मुली – कीर्ती व आकृती – यांच्यासह वडवळ पाटी येथील विष्णू नरुटे यांच्या घरात भाड्याने राहत होते. काही काळापासून तेजस्विनी ही दोन्ही सावत्र मुलींना सतत मारहाण व छळ करत होती. किरकोळ कारणांवरून ती मुलींना अमानुषपणे मारहाण करत होती आणि अंगावर चटके देत शारीरिक इजा पोहोचवत होती.
शुक्रवार, १ ऑगस्ट रोजी सकाळी साडेदहाच्या सुमारास, रागाच्या भरात तिने तीन वर्षांची कीर्ती हिचा गळा दाबून खून केला. या घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
या प्रकरणी महिला पोलीस कर्मचारी अश्विनी सतीश घोलप यांच्या फिर्यादीवरून मोहोळ पोलीस ठाण्यात तेजस्विनी कोकणे हिच्याविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक कर्णेवाड हे करत आहेत.








