वृत्तसंस्था/ तेल अवीव
पॅलेस्टिनी दहशतवादी गट हमासने इस्रायलवर अचानक सीमापार हल्ला केल्यानंतर गाझामधील संघर्ष गेल्या तीन आठवड्यांपासून सुरू आहे. इस्रायली संरक्षण दलाने गेल्या 24 तासात गाझापट्टीमध्ये 250 हून अधिक ठिकाणी हल्ले चढवले. ज्यूबहुल देशात आतापर्यंत सुमारे 1,400 लोक मारले गेले आहेत. 7 ऑक्टोबरच्या हल्ल्याचा बदला म्हणून इस्रायल देखील गाझावर सतत बॉम्बफेक करत असून त्यात 7,000 हून अधिक पॅलेस्टिनी नागरिकांना आपला जीव गमवावा लागला.
इस्रायली लष्कराने (आयडीएफ) हमासवर जमिनीवर हल्ला करण्याच्या तयारीत शुक्रवारी गाझापट्टीमध्ये घुसखोरी केली. तथापि, हमासचे गाझामध्ये अनेक किलोमीटर भूगर्भात पसरलेल्या बोगद्यांचे जाळे हे इस्रायली सैन्यासमोरील सर्वात मोठे आव्हान ठरत आहे. या बोगद्यांमध्ये हमासने अनेक ओलिसांना ठेवल्यामुळे प्रत्यक्ष कारवाई करताना मर्यादा पडत आहेत. हमास आणि त्याच्या बोगद्याच्या जाळ्यांशी लढण्यासाठी इस्रायल कथितपणे ‘स्पंज बॉम्ब’ बनवत आहे. या नव्या तंत्रज्ञानाचा आधार घेत इस्रायल आता हमासविरोधातील लढा अधिक तीव्र करण्याच्या तयारीत असल्याचे समजते. इस्रायल सध्या एका रासायनिक ग्रेनेडची चाचणी करत असून त्यामध्ये कोणतेही स्फोटक नसल्याचा दावा केला जात आहे.
आणखी एका हमास कमांडरचा खात्मा
अल जझीराच्या वृत्तानुसार, इस्रायलच्या हल्ल्यात हमासच्या वेस्टर्न खान युनूस बटालियनचा कमांडर मिधात मबाशेर मारला गेला आहे. इस्रायलची सुरक्षा एजन्सी शिन बेटच्या सहकार्याने लष्कराने गुऊवारी रात्री ही कारवाई केली. लष्कराच्या म्हणण्यानुसार, मिधात मबाशेरने इस्रायली वसाहती आणि लष्कराच्या विरोधात स्फोट घडवून आणले होते.









