सहा मोटारसायकली जप्त
बेळगाव : मोटारसायकली चोरणाऱ्या तिघा अट्टल चोरट्यांना ऐगळी, ता. अथणी पोलिसांनी अटक केली आहे. त्यांच्याजवळून चोरीच्या सहा मोटारसायकली जप्त केल्या आहेत. जिल्हा पोलीसप्रमुख डॉ. संजीव पाटील यांनी ही माहिती दिली आहे. अथणीचे पोलीस निरीक्षक रवींद्र नायकोडी यांच्या नेतृत्वाखाली ऐगळी पोलिसांनी ही कारवाई केली. प्रशांत सदाशिव बाडगी (वय 21), शिवानंद सिदराय उमराणी (वय 23), शिवराज बसाप्पा उप्पार (वय 23) तिघेही राहणार बिज्जरगी, जि. बागलकोट अशी त्यांची नावे आहेत. केवळ अथणी तालुकाच नव्हे तर वेगवेगळ्या ठिकाणी दुचाकी चोरल्याची कबुली या त्रिकुटाने दिली आहे. रविवारी त्यांना अटक करून न्यायालयासमोर हजर करण्यात आले. जिल्ह्यात गेल्या आठवडाभरात घटप्रभा, अंकलगी व बेळगाव शहरातील मार्केट पोलिसांनीही दुचाकीचोरांना अटक केली आहे.









