शहापूर येथील मारुती चौगुले यांचा युवापिढी पुढे आदर्श अमरनाथ, वैष्णोदेवी, केदारनाथ यात्रा पूर्ण
बेळगाव : आपल्या रोजच्या जीवना व्यतिरिक्त सुंदर निसर्गाच्या सान्निध्यात राहून मानसिक, शारीरिक सदृढपणा ठेवणे आवश्यक असते. याने आपले मन प्रसन्न राहण्यास मदत होते. यासाठी आपण विविध ठिकाणी ट्रेकिंगवर जाणे आवश्यक असते. शहापूर येथील कोरे गल्लीमधील रहिवासी मारुती चौगुले यांनी नुकतीच अमरनाथ, वैष्णोदेवी, केदारनाथ या तीन खडतर असणाऱ्या टेकिंग यात्रा यशस्वीपणे पूर्ण केल्या. चौगुले यांनी वयाच्या 54 व्या वर्षी लागोपाठ तीन यात्रा पूर्ण केल्या आहेत. यामुळे मारुती चौगुले यांनी इतरांसमोर एक आदर्श निर्माण केला आहे.
मारुती चौगुले यांनी अमरनाथ यात्रा 50 कि. मी. असून, 31 जुलै रोजी 28 कि.मी. चढाई तर 1 ऑगस्टला 18 कि.मी चढाई व उतार केला. वैष्णोदेवी यात्रा 22.85 कि.मी असून 12.25 कि.मी चढाई तर 10.60 कि.मी. उतार आहे. तर केदारनाथ यात्रा 34.64 कि.मी असून 28.26 कि.मी. चढाई तर 16.38 कि.मी उतार ट्रेकिंग करून पूर्ण केली आहे. विशेष म्हणजे यात्रा करत असतान त्यांनी पाठीवर 15 किलो वजन असलेले जीवनावश्यक वस्तूंचे ओझे घेऊन यात्रा केली आहे. यात्राकाळात त्यांनी घोडेवाला, पाठीवरून घेऊन जाणाऱ्यांची मदत न घेता कमी वेळेमध्ये लागोपाठ तीन ट्रेकिंग यात्रा पूर्ण केल्या आहेत.
जवळून दर्शन घेतल्याने समाधानी
आपला अनुभव सांगताना चौगुले म्हणाले, अमरनाथ, केदारनाथ यात्रा पर्वतीय क्षेत्र समुद्र सपाटीपासून 15 हजार फूट उंचीवर आहे. कमी ऑक्सिजन, पाऊस, पूर, भुस्स्खलन, कडाक्याची थंडी याचा सामना केला आहे. तसेच कधी, कोठेही काहीही होण्याची शक्यता असणाऱ्या आव्हानात्मक परिस्थितीवर मात करत यात्रा पूर्ण केली आहे. भगवान शंकर, भगवान केदारनाथ यांचे जवळून दर्शन घेतल्याने समाधानी असून, मनप्रसन्न असल्याचे त्यांनी सांगितले.









