जिल्हा व तालुकास्तरावरील अधिकारी उपस्थित राहून मुलांचे स्वागत पहिल्या दिवशी मोफत पुस्तके देणार
प्रतिनिधी/सांगली
जिल्ह्यातील सुमारे तीन हजार शाळांची उद्या घंटा वाजणार आहे. उन्हाळी सुट्टीनंतर सुरू होणाऱ्या शाळेमध्ये जिल्हा व तालुकास्तरावरील अधिकारी उपस्थित राहून मुलांचे स्वागत करणार आहे. शाळेच्या पहिल्या दिवशी सर्व मुलांना मोफत पुस्तके देण्यात येणार असल्याची माहिती शिक्षणाधिकारी मोहन गायकवाड यांनी दिली.
कोरोनामुळे गेली दोन वर्षे शाळा बंद राहिल्या. मात्र गेल्यावर्षी अनेक शाळा अर्धवेळ सुरू झाल्या होत्या. सध्या कोरोनाची लाट ओसरली असून नवीन शैक्षणिक वर्ष सुरळीत सुरू होणार आहे. उन्हाळी सुट्टीनंतर उद्यापासून जिल्ह्यातील शाळांची घंटा वाजणार असून यामध्ये प्राथमिकच्या 1688, खासगी 450, माध्यमिकच्या 724 शाळा आहेत. दोन वर्षानंतर शाळांच्या परिसरात पुन्हा मुलांचा किलबिलाट सुरू होणार असून पालक आणि मुलांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. शिक्षणाधिकारी मेहन गायकवाड यांनी सर्व मुख्याध्यापक आणि गटशिक्षणाधिकारी यांची ऑनलाईन बैठक घेवून योग्य त्या सुचना दिल्या आहेत.
याबाबत माहिती देताना शिक्षणाधिकारी गायकवाड म्हणाले, शाळेच्या पहिल्या दिवशी पहिली ते आठवी पर्यंतच्या सर्व मुलांना मोफत पुस्तके देण्यात येणार आहेत. याशिवाय सर्व मुली आणि एस्सी, एनटी आणि एसटी मुलांना मोफत गणवेश देण्यात येणार आहेत. कोरोनाच्या पार्श्वमूमिवरही शाळा सॅनिटाझर करावी, तसेच परिसर स्वच्छ करण्याच्या सुचना देण्यात आल्या आहेत. मुलांची आरोग्य तपासणी करावी, सर्दी, ताप, खोकला लक्षणे आढळून आल्यास योग्य ती कार्यवाही करावी, तसेच जिल्ह व तालुकास्तरावरील अधिकारी शाळेत उपस्थित राहून मुलांचे पुष्पगुच्छ देवून स्वागत करणार असल्याचेही शिक्षणाधिकारी गायकवाड यांनी सांगितले.








