गावोगावी मोहीम सक्रिय : बालक, गर्भवती महिलांना लस : लसीकरण झालेल्यांना प्रमाणपत्रे वितरीत
बेळगाव : जिल्हा प्रशासन, जिल्हा पंचायत, जिल्हा आरोग्य व कुटुंब कल्याण विभाग यांच्यामार्फत इंद्रधनुष्य लसीकरण मोहिमेला प्रारंभ झाला आहे. मागील पाच दिवसात बेळगाव तालुक्यातील 3214 जणांचे लसीकरण करण्यात आले आहे. लसीकरणापासून वंचित राहिलेल्यांसाठी ही मोहीम हाती घेण्यात आली आहे. तालुक्यातील प्रत्येक प्राथमिक आरोग्य केंद्र आणि गावोगावी फिरून ही मोहीम राबविली जात आहे. 583 गर्भवती महिला, दोन वर्षाखालील 2230 बालके आणि दोन ते पाच वयोगटातील 4001 बालकांना ही लस देण्यात आली आहे. पहिल्या टप्प्यात 7 ते 12 ऑगस्टपर्यंत मोहीम चालणार आहे. तर दुसऱ्या टप्प्यात 11 ते 16 सप्टेंबर तर तिसऱ्या टप्प्यात 9 ते 14 ऑक्टोबरपर्यंत ही मोहीम हाती घेतली जाणार आहे.
बालकातील मृत्यू-आजाराचे प्रमाण कमी करण्यासाठी लसीकरण
बालकातील मृत्यू व आजाराचे प्रमाण कमी करण्यासाठी लसीकरण हे प्रभावी साधन आहे. यानुसार लसीकरणापासून वंचित असलेल्यांना, अर्धवट लसीकरण झालेल्यांना व गर्भवती महिलांना ही लस दिली जात आहे. आशा कार्यकर्त्या, अंगणवाडी सेविका आणि आरोग्य विभागाच्या कर्मचाऱ्यांमार्फत घरोघरी जाऊन लसीकरण होत आहे. प्राथमिक आरोग्य केंद्रे, उपकेंद्रे, आणि अंगणवाडी केंद्रात लसीकरण मोहीम राबविण्यात येत आहे. दरम्यान लसीकरण झालेल्यांना प्रमाणपत्रे वितरीत केले जात आहेत.
दुसऱ्या टप्प्यात सप्टेंबर महिन्यापर्यंत मोहीम…
लसीकरणापासून वंचित राहिलेल्या बालक आणि गर्भवती महिलांसाठी इंद्रधनुष्य मोहीम सुरू झाली आहे. पहिल्या टप्प्यात आतापर्यंत तीन हजार जणांचे लसीकरण झाले आहे. दुसऱ्या टप्प्यात सप्टेंबर महिन्यातदेखील ही मोहीम राबविली जाणार आहे.
– डॉ. शिवानंद मास्तीहोळी (तालुका आरोग्य अधिकारी)









