राजस्थानात सहलीच्या बसला अपघात, 17 जण जखमी
वृत्तसंस्था/ जयपूर
राजस्थानमधील पाली भागात झालेल्या एका भीषण रस्ते अपघातात 3 विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला. तसेच अन्य 17 विद्यार्थी जखमी झाले आहेत. राजस्थानमधील देसुरी येथील चारभुजा नाल भागात पंजाब मोडजवळ ही घटना घडल्याचे सांगण्यात आले. एका शाळेतील 60 ते 65 विद्यार्थी शालेय सहलीच्या निमित्ताने परशुराम महादेवजींच्या दर्शनासाठी गेले असता ही दुर्घटना घडली. सहलीहून परतत असताना चालकाचे बसवरील नियंत्रण सुटल्याने बस पलटी झाली. या अपघातानंतर विद्यार्थ्यांमध्ये गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. बस पलटी झाल्याने विद्यार्थ्यांमध्ये एकच गोंधळ उडाला. तात्काळ स्थानिक लोकांनी घटनास्थळ गाठून विद्यार्थ्यांना बाहेर काढले आणि अपघाताची माहिती पोलीस प्रशासनाला दिली.
घटनेची माहिती मिळताच देसुरी व चारभुजा येथील रुग्णवाहिका आणि स्थानिक पोलीस घटनास्थळी दाखल झाले. जखमींना प्रथम देसुरी आणि चारभुजा रुग्णालयात पाठवण्यात आले. तेथे त्यांच्यावर प्राथमिक उपचार करण्यात आले. यानंतर गंभीर जखमी विद्यार्थ्यांना राजसमंद येथे रेफर करण्यात आले. या अपघातानंतर राजसमंदचे पोलीस अधीक्षक आणि जिल्हाधिकाऱ्यांनीही रुग्णालयात पोहोचून जखमींची प्रकृती जाणून घेतली. अपघातानंतर स्थानिक प्रशासन आणि पोलीस या प्रकरणाचा तपास करण्यात व्यग्र आहेत. या अपघाताची गांभीर्याने चौकशी सुरू करण्यात आली आहे.









