महापालिकेची कारवाई, नागरिकांतून समाधान
बेळगाव : शहरातील मोकाट जनावरे पकडण्याची मोहीम महापालिकेच्यावतीने पुन्हा एकदा हाती घेण्यात आली आहे. मंगळवारी नरगुंदकर भावे चौकात फिरणाऱ्या तीन मोकाट जनावरांना पकडून त्यांची रवानगी श्रीनगर येथील गोशाळेत करण्यात आली. महापालिकेने केलेल्या या कारवाईबाबत समाधान व्यक्त केले जात असले तरी या कारवाईत सातत्य ठेवण्यात यावे, अशी मागणी केली जात आहे. शहर आणि उपनगरात मोकाट जनावरांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. मात्र मोकाट जनावरांचा बंदोबस्त करण्याकडे महापालिकेकडे दुर्लक्ष केले असल्याने विविध ठिकाणी जनावरांचे कळप ठाण मांडून बसत आहेत. याचा फटका वाहतूक व्यवस्थेला बसत असून शहरात मोकाट जनावरे सोडण्यात येऊ नये, अशी सूचना जनावर मालकांना केली जात आहेत. पण जनावरांच्या मालकांकडून याकडे दुर्लक्ष केले जात आहे. मध्यंतरी पार पडलेल्या बैठकीत जनावर मालकांना विविध सूचना करण्यात आल्या होत्या. मात्र त्या बैठकीचा फायदा झालेला नाही. अद्यापही विविध ठिकाणी जनावरांचे कळप ठाण मांडून बसत आहेत. मुख्य रस्त्यावर त्याचबरोबर बाजारपेठेत जनावरे फिरत आहेत. त्यामुळे मोकाट जनावरांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी केली जात आहे. त्यानुसार मंगळवारी महापालिकेचे पशुसंगोपन निरीक्षक राजू संकण्णावर यांनी तीन मोकाट जनावरे पकडली.









