परूळे/(भूषण देसाई)
वेंगुर्ले तालुक्यातील तीन सुपुत्र विधानसभेवर आमदार म्हणून निवडून आले आहेत. मूळ भोगवे- नेवाळी आणि आता वेंगुर्ले -भटवाडी येथील रहिवासी असलेले उदय सामंत, किरण सामंत व मातोंड येथील महेश सावंत हे आमदार म्हणून निवडून आले असून वेंगुर्ले तालुक्यातून आनंद व्यक्त होत आहे. तसेच वेंगुर्ले तालुक्याला विधानसभेवर प्रतिनिधित्व मिळवत तिघे आमदार झाल्याने वेंगुर्लेच्या विकासास चालना मिळणार असल्याचा सूर व्यक्त होत आहे.उदय सामंत
यांना मंत्रिपद मिळाल्यास वेंगुर्लेचा औद्योगिक व इतर विकास होण्यास मदत होणार आहे. माजी पालकमंत्री उदय सामंत यांनी केलेले कार्य पाहता त्यांना निश्चितच मंत्रिपद मिळून वेंगुर्ले तालुक्याच्या विकासात योगदान देण्याची संधी मिळावी,अशी भावना कार्यकर्त्यातून ,समस्त वेंगुर्लेवासीयातून व्यक्त होत आहे.
मातोंड गावचे सुपुत्र विधानसभेवर आमदार
वेंगुर्ले तालुक्यातील मातोंड -सावंतवाडा गावचे सुपुत्र महेश सावंत हे माहीम विधानसभा मतदारसंघातून उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षातर्फे निवडून येत आमदार झाले. त्यामुळे वेंगुर्ले तालुक्यातील मातोंड गावात आनंद व्यक्त होत आहे.वेंगुर्ले तालुक्यातील मातोड सावंतवाडा येथील रहिवासी असलेले व सध्या प्रभादेवी येथील रहिवासी असलेले ठाकरे शिवसेनेचे उमेदवार महेश सावंत यांनी आपल्या मतदारसंघात शिंदे सेनेच्या सदा सरवणकर व राज ठाकरे यांचे सुपुत्र मनसेच्या अमित ठाकरे यांचा पराभव करून ते आमदार म्हणून निवडून आले आहेत. महेश सावंत यांना 46, 579 मते मिळाली. शिंदे सेनेच्या सदा सरवणकर यांना 45, 239 मते मिळाली. तर मनसेच्या अमित ठाकरे यांना 30,703 एवढी मते मिळाली. महेश सावंत हे १३४० एवढ्या थोडक्या मताधिक्याने निवडून आले. मातब्बर उमेदवारांना त्यांनी पराभूत करून विजय मिळविला. मातोंड सावंतवाडा येथील एका शेतकरी गरीब कुटुंबातील असलेले महेश सावंत यांचे वडील मिल कामगार म्हणून होते. मातोंड गावाला विधानसभेवर प्रतिनिधित्व मिळाले याचे मनोमन समाधान वाटते, अशी प्रतिक्रिया येथील ग्रामस्थांतून व्यक्त होत आहे दरम्यान वेंगुर्ले तालुक्याचे सुपुत्र विधानसभेत प्रतिनिधित्व मिळाल्याने तालुक्यातूनही आनंद व्यक्त होत आहे.महायुतीचे उमेदवार उदय रवींद्र सामंत (१,११,३३५ मते) यांनी उद्धव ठाकरे शिवसेनेच्या बाळा माने (६९७४५ मते) यांचा पराभव करून आमदार म्हणून ते पाचव्यांदा निवडून आले आहेत. तसेच त्यांचे बंधू किरण रवींद्र सामंत हे राजापूर मतदार संघातून पहिल्यांदा आमदार म्हणून निवडून आले आहेत. त्यांनी उद्धव ठाकरे शिवसेनेच्या राजन साळवी यांचा पराभव केला आहे. उदय सामंत यांनी सिंधुदुर्गचे पालकमंत्री, उद्योगमंत्री, नगरविकास मंत्री आदी पदे भूषवलेली आहेत. त्यांनी वेंगुर्लेच्या विकासासाठी मोठे योगदान दिले आहे. यादरम्यान त्यांनी नाटककार मधुसूदन कालेलकर सभागृह, बॅरिस्टर नाथ पै सभागृह, झुलता पूल आदींसाठी तसेच नगरपालिका कार्यक्षेत्रातील विविध विकास कामांसाठी निधी उपलब्ध करून दिला आहे.









