वृत्तसंस्था/ इस्लामाबाद
पाकिस्तानातील बलुचिस्तानमधील ग्वादर भागात सोमवारी झालेल्या हेलिकॉप्टर अपघातात दोन पाकिस्तानी नौदल अधिकारी आणि एक सैनिक ठार झाल्याची माहिती नौदलाच्या प्रवक्त्याकडून देण्यात आली आहे. ग्वादरमध्ये प्रशिक्षणादरम्यान हेलिकॉप्टर दुर्घटनाग्रस्त झाले असून तांत्रिक बिघाडामुळे समस्या उद्भवल्याचे स्पष्ट करण्यात आले. या दुर्घटनेत पाकिस्तानी नौदलाचे दोन अधिकारी आणि एक जवान हुतात्मा झाला, असे प्रवक्त्याने सांगितले. या घटनेची चौकशी सुरू करण्यात आली आहे. ‘पाकिस्तान मुस्लीम लीग-नवाज’च्या वरिष्ठ उपाध्यक्ष मरियम नवाज यांनी या घटनेत झालेल्या जीवितहानीबद्दल शोक व्यक्त केला. दरम्यान, नॅशनल असेंब्लीचे स्पीकर राजा परवेझ अश्र्रफ यांनीही शोक व्यक्त करत मृत जवानांच्या कुटुंबियांप्रति सांत्वनपर संदेश जारी केला आहे.









