20 लाखाचे नुकसान : मशिनरी भक्ष्यस्थानी
प्रतिनिधी /निपाणी
निपाणीतील शिंत्रे कॉलनी येथे मंगळवारी मध्यरात्री दीड वाजण्याच्या सुमारास शॉर्टसर्किटने लागलेल्या आगीत तीन दुकाने खाक झाली. या आगीमध्ये महेश चव्हाण यांचे शालीमार प्रिंटिंग प्रेस, नवाज गफार कडगी यांचे कडगी आयर्न ऍण्ड स्टील वर्क्स तर ओंकार रवींद्र भोईटे यांचे प्रुट स्टॉल आगीत खाक झाले.
या आगीत सुमारे 20 लाख रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. आगीत प्रिन्टिंग मशीन, वेल्डिंग मशीन, फर्निचर, सोलार असे किंमती साहित्य जळाले.
शिंत्रे कॉलनीतील व्यापारी मंगळवारी रात्री आपापली दुकाने बंद करून नेहमीप्रमाणे घरी गेले होते. रात्री दीडच्या सुमारास अचानक तिन्ही दुकानांना आग लागली. आगीची घटना लक्षात येताच परिसरातील नागरिकांनी त्वरित निपाणी अग्निशमन दलास माहिती दिली. तत्पूर्वी या तिन्ही दुकानातील सर्व साहित्य जळून खाक झाले होते.
महेश चव्हाण यांच्या शालिमार प्रिन्टिंग प्रेसमधील ऑफसेट मशीन, कटिंग मशीन, स्टेशनरी व पेपर तर कडगी आयर्न अँड स्टील वर्क्समधील वेल्डिंग मशीन ग्राइं&डर, ड्रिल मशीन, वायरिंग, ऑफिस फर्निचर, ब्रेस डील व शेड जळाले. ओंकार रवींद्र भोईटे यांच्या प्रुट स्टॉलमधील कॅरेट, फळे, 15 हजाराची रोकड तसेच सोलार जळून खाक झाले.
निपाणी अग्निशमन दलाचे जवान ए. आय. रुद्रगौडर, ए. डी. मुल्ला, डी. एम. निर्मळे, वासिम मोमीन, जी. एस. कांबळे, बी. ए. कुंभार, एस. बी. मगदूम, बी. एस. देवऋषी या सर्वांनी मिळून आग आटोक्मयात आणली. अग्निशमन दलाच्या सजगतेमुळे नजीकच्या घरांचा आगीपासून बचाव करण्यात यश मिळाले. तहसीलदार प्रवीण कारंडे, नगराध्यक्ष जयवंत भाटले, सभापती राजू गुंदेशा, लक्ष्मण चिंगळे, राजेश कदम यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. सदर घटनेसंबंधी निपाणी शहर पोलीस ठाण्यातील उपनिरीक्षक कृष्णवेणी गुर्लहोसुर अधिक तपास करीत आहेत.