‘क्वांटम मॅकॅनिकल इफेक्ट’संबंधी महत्वाचे शोध
वृत्तसंस्था / स्टॉकहोम
तीन शास्त्रज्ञांना 2025 चा भौतिकशास्त्राचा नोबेल महापुरस्कार विभागून देण्यात आला आहे. या शास्त्रज्ञांची नावे जॉन क्लार्क, मायकेल डेव्होरेट आणि जॉन मार्टिनीस अशी आहेत. या शास्त्रज्ञांनी ‘क्वांटम मॅकेनिकल इफेक्ट’ संबंधी महत्वाचे संशोधन केले आहे. या संशोधनाचा उपयोग भौतिकशास्त्रातील ‘व्यवस्था प्रक्रिया’ किंवा ‘सिस्टिम प्रोसेस’ समजून घेण्यासाठी होत आहे. त्यांच्या या महत्वपूर्ण संशोधनाचा गौरव करण्यासाठी त्यांना हा पुरस्कार घोषित करण्यात आला आहे, असे वक्तव्य नोबेल पारितोषक प्रदान करणाऱ्या समितीने केले आहे.
हा पुरस्कार मिळवणारे जॉन क्लार्क हे शास्त्रज्ञ अमेरिकेतील बर्कले येथल्या कॅलिफोर्निया विद्यापीठाचे प्राध्यापक आहेत. तर अमेरिकेतीलच येल विद्यापीठाचे संशोधक मायकेल एच. डेव्होरेट यांनीही हा पुरस्कार मिळविला आहे. या पुरस्काराचे तिसरे मानकरी जॉन एम. मार्टिनीस हे असून ते सांता बार्बारा येथील कॅलिफोर्निया विद्यापीठाचे संशोधक आहेत. अशा प्रकारे यंदा अमेरिकेच्याच तीन शास्त्रज्ञांना भौतिक शास्त्राचा हा महापुरस्कार प्राप्त झाला आहे.
व्यवस्थात्मक संशोधन
‘क्वांटम मेकॅनिकल इफेक्ट’ साध्य करण्यासाठी एखाद्या भौतिकशास्त्रीय सिस्टिमचा आकार जास्तीत जास्त किती असावा लागतो, हा भौतिक शास्त्रतील किंवा फिजिक्समधील सर्वात महत्वाचा प्रश्न आहे. या प्रश्नाची उकल करण्यासाठी या तीन्ही शास्त्रज्ञांनी गेली अनेक वर्षे संशोधन केले आहे. त्यांनी असे सिद्ध केले आहे, की हा इफेक्ट कोणत्याही आण्विक किंवा अंशाण्विक (सबअॅटॉमिक) आकारावर किंवा पातळीवर अवलंबून नसतो. या शास्त्रज्ञांनी या विषयावर 1984 ते 1985 या काळात अनेक प्रयोग केले. त्यांनी आपला निष्कर्ष सिद्ध करण्यासाठी सुपरकंडक्टर्सचे एक इलेक्ट्रॉनिक सर्किट सज्ज केले. या सर्किटमधील सुपरकंडक्टर्स एकमेकांपासून एका पातळ नॉन कंडक्टिव्ह वलयाने वेगळे करण्यात आले होते. या सर्किटला ‘जोसेफसन जंक्शन’ अशी संज्ञा आहे.
या साधनाचा उपयोग
या सर्किटमधून जेव्हा विद्युत प्रवाह सोडला जातो, तेव्हा असे दिसून येते की या सिस्टिमधील सर्व भारित किंवा चार्जड् पार्टिकल्स एकमेकांसारखीच वर्तणूक करतात. याचाच अर्थ असा की, असा इफेक्ट किंवा परिणाम मिळविण्यासाठी जास्तीत जास्त किंवा कमीत कमी किती पार्टिकल्स लागतात हे त्या पार्टिकल्सच्या संख्येवर अवलंबून नसून त्यांच्यातील विद्युत भारावर अवलंबून आहे. हे संशोधन भौतिक शास्त्रातील एका मोठ्या प्रश्नाची उकल करणारे असून या संशोधनाचा उपयोग पुढच्या काळात कृत्रिम बुद्धीमत्ता तंत्रज्ञान विकसीत करण्यासाठी होणार आहे.
आज रसायनशास्त्राचा पुरस्कार
नोबेल पुरस्कार समितीकडून आज बुधवारी रसायनशास्त्र या विषयातील नोबेल पुरस्काराची घोषणा केली जाणार आहे. हा पुरस्कारही एकाहून अधिक शास्त्र‹ंना दिला जाईल, अशी शक्यता आहे. या पुरस्कारासाठी अनेक शास्त्रज्ञांची नावे स्पर्धेत असून कोणाला हा जगातील सर्वात मोठा बहुमान मिळणार याची उत्सुकता आहे.









