बेंगळूर, हैदराबाद येथे सापडले पोलिसांच्या ताब्यात : चारजणांचा शोध जारी, बेळगावातही कसून तपास
म्हापसा : गणेशपुरी म्हापसा येथील दरोडाप्रकरणी बेंगळूर व हैदराबाद येथून तिघांच्या मुसक्या आवळण्यात पोलिसांना यश आले आहे. याशिवाय कारचालक आणि त्याच्या सहकाऱ्याची कसून चौकशी सुरू असून यात सहभाग असणाऱ्या इतरांचा शोध सुरू आहे. या तिघा संशयितांना घेऊन राज्य गुन्हा अन्वेषण विभागाचे पोलिस गोव्यात यायला निघाले असल्याची माहिती सूत्रांनी दिली. बेळगाव येथे ज्या ठिकाणी हे दरोडेखोर उतरले होते, त्याठिकाणचे सीसी टीव्ही कॅमेरांची तपासणी बेळगाव पोलिसांच्या मदतीने गोवा पोलिस करीत आहेत. काही दिवसांपूर्वी दोनापावला येथे पडलेल्या आणि म्हापसा येथील या दरोड्यात एकच टोळी असावी, अशी शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे.
पोलिस ड्रायव्हरला घेऊन बेळगावला गेले असून त्याची बेळगावात चौकशी सुरू आहे. पोलिस निरीक्षक तुषार लोटलीकर यांच्या नेतृत्वाखाली गुन्हा अन्वेषण शाखेच्या पथकाने तिघा दरोडेखोरांना बेंगळूर व हैदराबाद येथे ताब्यात घेतल्याची माहिती पोलिस सूत्रांनी दिली. गणेशपुरी म्हापसा येथील गृहनिर्माण वसाहतीमधील भरवस्तीत असलेल्या डॉ. महेंद्र मोहन घाणेकर यांच्या बंगल्यावर मंगळवारी पहाटे सात दरोडेखोरांनी सशस्त्र दरोडा टाकला होता. कुटुंबीयांना सुरीचा धाक दाखवून तसेच मारहाण करून सुमारे 50 लाखांचा ऐवज लुटण्यात आला होता. दरोडा टाकल्यानंतर दरोडेखोर बेळगावात पसार झाल्याचा संशय पोलिसांना होता. त्यानुसार बेंगळूरू, हैदराबाद येथून तिघांच्या मुसक्या आवळण्यात पोलिसांना यश आले आहे.
दरोडेखोरांचे कॅसिनो लिंक?
पोलिसांना तपासादरम्यान मिळालेल्या माहितीनुसार या दरोडेखोरांपैकी काहीजण गोव्यातील कॅसिनोंमध्ये खेळण्यासाठी ये-जा करत होते. मोठ्याप्रमाणात ते कॅसिनोंत पैशांची उधळपट्टी करत होते. त्यासंदर्भात पोलिस तपास करत आहेत.
बेळगावहून तपास जारी
पोलिसांचे एक पथक बेळगावला रवाना झाले असून जुने गोवे येथील टॅक्सीचालकालाही त्यांनी नेले आहे. या टॅक्सीचालकाने दरोडेखोरांना बेळगाव बसस्थानकावर ज्या ठिकाणी सोडण्यात आले होते, त्या ठिकाणाची तपासणी तसेच सीसीटीव्ही कॅमेराची तपासणी राज्य पोलिस बेळगाव पोलिसांच्या सहकार्याने करीत आहेत. एकूण सहाजण गाडीतून बेळगावला उतरले होते अशी माहिती त्या ड्रायव्हरने पोलिसांना दिली असून त्या दृष्टीकोनातून पोलिस तपास करीत आहेत.









