वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
पाचवेळा आयपीएलचे जेतेपद मिळविणाऱ्या मुंबई इंडियन्स संघाने जॉनी बेअरस्टो, रिचर्ड ग्लीसन व चरिथ असालंका यांना करारबद्ध केले आहे. राष्ट्रीय संघातून खेळण्यासाठी विदेशी खेळाडू मायदेशी परतणार असल्याने त्यांच्या जागी या खेळाडूंना घेण्यात आले आहे.
इंग्लंडचा विल जॅक्स, दक्षिण आफ्रिकेचे रायन रिकेल्टन व कॉर्बिन बॉश 26 मे रोजी पंजाब किंग्सविरुद्ध शेवटचा साखळी सामना झाल्यानंतर मायदेशी परतणार आहेत. ‘जॅक्सच्या जागी इंग्लंडचा यष्टिरक्षक फलंदाज जॉन बेअरस्टोला 5.25 कोटी रुपयांना संघात घेतले आहे,’ असे आयपीएलने सांगितले. ‘इंग्लंडचाच वेगवान गोलंदाज रिचर्ड ग्लीसनला रिकेल्टनच्या जागी 1 कोटी रुपयांना तर लंकेच्या असालंकाला कॉर्बिन बॉशच्या जागी 75 लाख रुपयांना मुंबईने घेतले आहे,’ असेही त्यांनी सांगितले. तिघेही प्लेऑफ टप्प्यापासून मुंबईसाठी उपलब्ध होतील.









