पर्यटकांना लुबाडल्याच्या तक्रारी
पणजी : गेल्या काही दिवसांपूर्वी दोनापावला येथे प्रेमीयुगुलांना लुटणाऱ्या दोन पोलिसांना निलंबित केल्यानंतर आता आगशी पोलीस स्थानकातील एका पोलीस कॉन्स्टेबलने पर्यटकाला पाच हजार ऊपयांना लुटल्याप्रकरणी निलंबित करण्यात आले आहे. पोलीस अधीक्षक निधीन वाल्सन यांनी तसा आदेश जारी केला आहे. गेल्या चार दिवसांत तीन पोलिसांना निलंबित करण्यात आले आहे. पोलीस खात्याने भ्रष्ट पोलीस कर्मचाऱ्यांच्या विरोधात कडक धोरण अवलंबले आहे. पोलीस जनतेचे रक्षक असल्याचे प्रत्येक कर्मचाऱ्यांनी लक्षात ठेवणे आवश्यक आहे. भ्रष्ट पोलीस कर्मचाऱ्यांबाबत कोणतीही गय केली जाणार नाही, असे वाल्सन यांनी सांगितले.
पर्यटकांकडून घेतले पैसे
सोमवारी निलंबित केलेल्या पोलीस कॉन्स्टेबलचे नाव संतोष चव्हाण असे आहे. 16 एप्रिल रोजी या कॉन्स्टेबलने पर्यटकांना रस्त्यावर अडविले आणि ‘रेंट अ कार’ घेतल्याप्रकरणी दहा हजार ऊपये चलन देण्यात येणार असल्याचे पर्यटकांना सांगितले. पर्यटकांनी कार मालकाला याबाबत कळविले असता या कॉन्स्टेबलने नंतर पाच हजार ऊपयांची मागणी केली. पेसे भलत्याच व्यक्तीच्या खात्यात गुगल पे करण्यास सांगितले. पैसे मिळाल्याचे निश्चित झाल्यानंतर पर्यटकांना जाऊ देण्यात आले.
प्रकरण निरीक्षकांच्या माथी मारण्याचा प्रयत्न
पाच हजार रुपये पाठविल्याच्या पोच पावतीचा फोटो काढून तो पोलीस अधिकाऱ्यांना पाठविला होता. नंतर उपअधीक्षक विश्वेश कर्पे यांना तपास अधिकारी म्हणून नियुक्ती करून त्वरित तपास करण्यास सांगितले होते. कर्पे यांनी त्या कॉन्स्टेबलला बोलावून त्याची उलटतपासणी केली असता त्या कॉन्स्टेबलने सारा प्रकार निरीक्षकाच्या माथी मारून हात झटकण्याचा प्रयत्न केला. निरीक्षकांनी केला कॉन्स्टेबलचा भांडाफोड कर्पे यांनी निरीक्षकांना बोलविले आणि त्यांची उलटतपासणी केली असता निरीक्षकांनी एक सीसी टीव्ही फुटेज उपअधीक्षकांसमोर सादर केली आणि सारा प्रकार उघडकीस आला. कॉन्स्टेबल संतोष चव्हाण हा या प्रकरणात दोषी असल्याचे आढळून आल्यावर अधीक्षक वाल्सन यांनी संतोष चव्हाण याच्या निलंबनाचा आदेश जारी केला. त्याच्या चौकशीची सर्व कागदपत्रे दक्षता विभागाच्या अधीक्षकांकडे सादर करावी. या प्रकरणाचा पुढील तपास दक्षता विभाग करणार आहे, अशी सूचना उपअधीक्षक विश्वेश कर्पे यांना करण्यात आली आहे.









