वृत्तसंस्था/ बेंगळूर
भारताच्या बिगरमानांकित झील देसाईने विजयी घोडदौड कायम राखत येथे सुरू असलेल्या आयटीएफ महिलांच्या वर्ल्ड टेनिस टूरवरील स्पर्धेची उपांत्य फेरी गाठली. याशिवाय अन्य दोन भारतीयांनीही उपांत्य फेरीत स्थान मिळविले आहे.
झील देसाईने जर्मनीच्या अँटोनिया श्मिड्टवर संघर्षपूर्ण लढतीत 3-6, 6-7 (2-7), 6-4 अशी मात केली. आधीच्या फेरीत झीलने उझ्बेकच्या अग्रमानांकित निगिना अब्दुरायमोव्हाला पराभवाचा धक्का दिला होता. उपांत्य फेरीत मात्र तिला अवघड प्रतिस्पर्धी लाभला असून आपल्याच देशाच्या तिसऱ्या मानांकित रुतुजा भोसलेविरुद्ध तिला लढावे लागणार आहे. रुतुजाला ताप असला तरी तिने कझाकच्या पाचव्या मानांकित झिबेक कुलामबायेव्हावर 7-6 (7-4), 1-6, 6-1 असा विजय मिळवित आगेकूच केली. रश्मिका भामिदीपती ही उपांत्य फेरी गाठणारी तिसरी भारतीय आहे. तिने आपल्याच देशाच्या वैष्णवी आडकरचा 6-1, 6-4 असा पराभव केला,
थायलंडच्या दुसऱ्या मानांकित लॅनलाना तारारुदीने शेवटच्या चार फेरीत स्थान मिळविताना इटलीच्या सातव्या मानांकित डेलेटा चेरुबिनीला 6-1, 6-2 असे हरविले. उपांत्य फेरीत तिची लढत रश्मिकाशी होईल.









